मातृ सुरक्षा दिन विशेष: कोल्हापूर आरोग्य मंडळांतर्गत पाच वर्षांत ३८६ मातांचा प्रसूती काळात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 04:19 PM2024-07-10T16:19:29+5:302024-07-10T16:22:13+5:30
विविध योजनांच्या माध्यमातून ९३ कोटी वितरित
दीपक जाधव
कोल्हापूर : कोल्हापूर आरोग्य मंडळाअंतर्गत गेल्या पाच वर्षांत ३८६ मातांचा प्रसूती काळात मृत्यू झाला. सर्वाधिक १०८ मातांचे मृत्यू हे वर्ष २०२१-२२ मध्ये झाले. गतवर्षी हे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले असले, तरी ते पूर्ण नियंत्रणात आलेले नाही. गरोदर माता व नवजात शिशूचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या पाच वर्षांत विविध सात योजनांच्या माध्यमातून ९३ कोटींहून अधिक अनुदान गरोदर मातांना वितरित केले आहे.
मातृ सुरक्षा दिन आज बुधवारी आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने प्रसूती काळात माता मृत्यूचे प्रमाण शोधले. कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे येत असून, या जिल्ह्यांत बहुतांश ग्रामीण व दुर्गम भाग येतो. ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी एकूण २४४ प्राथमिक आरोग्य केंद्र, ११८८ आरोग्य उपकेंद्र, ४४ ग्रामीण रुग्णालय, १३ उपजिल्हा रुग्णालय, ३ जिल्हा रुग्णालय, तर २ महिला रुग्णालयामार्फत आरोग्य सेवा दिल्या जात असून, मात्र अजूनही काही खेड्यापाड्यांत दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत. यामुळे उपचारात अडचणी येऊन गरोदर मातांचे मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. अत्याधुनिक साधने त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने हे प्रमाण रोखता आलेले नाही.
गर्भावस्थेत काय काळजी घ्याल..?
- गर्भावस्थेत होणाऱ्या रक्तस्त्रावकडे दुर्लक्ष नकोच.
- लोह, कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळेल असा आहार घ्या..
- अतिशारीरिक कष्टाची कामे टाळा.
मृत्यूची कारणे
- प्रसूतिपूर्व उच्च रक्तदाब.
- अतिरक्तस्त्राव.
- जंतुदोष
पाच वर्षांतील माता मृत्यूची संख्या
- कोल्हापूर - १५४
- सांगली - १९१
- रत्नागिरी - ३३
- सिंधुदुर्ग - ०८
वाटप करण्यात आलेले अनुदान
जिल्हा : गरोदर माता : रक्कम
- कोल्हापूर : १,०८,६१३ : ४२ कोटी २ लाख ६५ हजार
- सांगली : ८४,८८४ : १० कोटी ३४ लाख ७४ हजार
- रत्नागिरी : ३२,०२७ : २९ कोटी २१ लाख ४७ हजार
- सिंधुदुर्ग : २५,३४२ : ११ कोटी ३८ लाख ६२ हजार
गरोदर माता साठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक गरोदर मातांची महिन्यातून एकदा सोनोग्राफी व स्त्रीरोगतज्ज्ञाकडून तपासणी करण्यात येऊन योग्य ते आवश्यक उपचार करण्यात येतात. - डाॅ. दिलीप माने, आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर.