गुन्ह्यातील ३९ फरारी आरोपी सापडेनात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:29 AM2021-09-16T04:29:58+5:302021-09-16T04:29:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात विविध गुन्ह्यांत १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सुमारे ३९ गुन्हेगार गेले काही वर्षे पोलिसांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात विविध गुन्ह्यांत १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सुमारे ३९ गुन्हेगार गेले काही वर्षे पोलिसांना गुंगारा देत आहेत. सर्व संशयित आरोपींना न्यायालयाने फरारी घोषित केले. हे गुन्हेगार पोलिसांच्या हाती सापडत नसल्याने त्यांच्याबाबतचा तपास गेले अनेक वर्षांपासून पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ३१ पोलीस ठाणी आहेत. राजारामपुरी, गांधीनगर, चंदगड या तीन पोलीस ठाण्यांत सर्वाधिक एकूण २० संशयित अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शिवाय करवीर, गोकुळ शिरगाव, इचलकरंजीतील शिवाजीनगर व शहापूर तसेच शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, हुपरी याही पोलीस ठाण्यांतील संशयित आरोपी न्यायालयाने फरार घोषित केले. अनेक आरोपींनी जामीन मिळाल्यानंतर ते जिल्हा सोडून बाहेरच निघून गेले आहेत. संघटित गुन्हेगारीसह खून, लूटमार, चोरी, मटका प्रकरणात संशयित आरोपी फरार आहेत. संशयित आरोपींना शोधणे पोलिसांना कठीण जात आहे. अनेक फरारी आरोपींनी परराज्यात आसरा घेतल्याचेही बोलले जाते.
पोलीस ठाणे : फरार आरोपी
- राजारामपुरी : ०५
- करवीर : ०२
- गांधीनगर : ०९
- चंदगड : ०६
- शिवाजीनगर (इचलकरंजी) : ०२
- शहापूर (इचलकरंजी) : ०२
- शाहूवाडी, गोकुळ शिरगाव, गगनबावडा, आजरा, हुपरी पोलीस ठाणे येथे प्रत्येकी ०१
- इतर पोलीस ठाणे : १२
पाच वर्षे फरार...
- महाराष्ट्रभर खळबळ उडालेल्या ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सहभागी संशयित विनय पवार व सारंग अकोलकर हे दोघे पोलिसांना सापडत नसल्याने न्यायालयाने त्यांना फरारी घोषित केले. त्यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात पाच वर्षांपूर्वीच गुन्हा नोंद आहे.
- यादवनगरात मटका व्यावसायिक सलीम मुल्ला व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर केलल्या हल्लाप्रकरणी तपासात महाराष्ट्रभर मटका रॅकेट उघडकीस आले. त्याप्रकरणी कोल्हापुरातील सम्राट कोराणे व मुंबईतील प्रकाश ऊर्फ पप्पू सावला या दोघांवर ठपका ठेवला. त्यां दोघांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली. दोघेही सापडत नसल्याने न्यायालयाने त्यांना फरारी घोषित केले. त्यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
- इचलकरंजीतील संघटित गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत कारवाई झालेले संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे हे दोघे बंधूही गेले अडीच वर्षे फरारी आहेत. त्यांचाही पोलिसांना ठावठिकाणा मिळेना.
मृत्यूनंतरही तपास...
गुन्ह्यातील आरोपीचा मृत्यू झाल्यास त्याचे मृत्यू प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत पोलिसांचा तपास सुरूच राहतो. संबधित आरोपीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यानंतर तो मरण पावल्याचे सिध्द होऊन तपास थांबला जातो. त्यामुळे अनेक प्रकरणांत आरोपींच्या मृत्यूनंतरही तपास सुरूच ठेवला जातो.
कोट...
फरार आरोपींचा पोलीस यंत्रणेकडून कसोशीने शोध सुरू आहे. वर्षभरात सहा फरार आरोपींना शोधून त्यांच्या मुसक्या आवळण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.