३९ कारखान्यांची साखर जप्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:49 AM2019-01-30T00:49:17+5:302019-01-30T00:49:21+5:30
कोल्हापूर : हंगाम सुरू होऊन पावणेतीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना एक रुपयाही न देणाºया राज्यातील ३९ साखर कारखान्यांवर महसुली ...
कोल्हापूर : हंगाम सुरू होऊन पावणेतीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना एक रुपयाही न देणाºया राज्यातील ३९ साखर कारखान्यांवर महसुली कारवाई करण्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला आहे. यामध्ये १८ खासगी, तर २१ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांकडे १८१३ कोटी ८१ लाख थकीत एफआरपी असून, त्यांची साखर जप्त करून शेतकºयांना एफआरपीप्रमाणे पैसे देण्याचे आदेश मंगळवारी रात्री उशिरा गायकवाड यांनी काढले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्याने सरकारला ही कारवाई करावी लागली आहे.
साखरेचे दर घसरल्याने एकरकमी एफआरपी देता येत नसल्याची भूमिका राज्यातील कारखान्यांनी घेतली. तर एकरकमी एफआरपीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम राहिली आहे. सोमवारी (दि. २८) साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत कारखान्यांवर कारवाईची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. मंगळवारी एफआरपी थकविणाºया कारखान्यांवर कारवाईसाठी ‘स्वाभिमानी’ प्रयत्नशील होती. राज्यातील ३९ कारखान्यांनी शेतकºयांना एक दमडीही दिलेली नाही. त्यांच्याकडे १८१३ कोटी ८१ लाखांची एफआरपी थकीत आहे. या कारखान्यांना नोटिसा काढून २४ जानेवारी रोजी त्यांची सुनावणी घेतली. पाच दिवसांत या कारखान्यांनी पैसे न दिल्याने मंगळवारी रात्री महसुली कारवाईचे आदेश आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘दत्त-शिरोळ’, ‘जवाहर’, ‘पंचगंगा’, ‘शरद’, ‘वारणा’, ‘गुरुदत्त’, ‘संताजी घोरपडे’, ‘इको केन शुगर’; तर सांगली जिल्ह्यातील ‘महाकाली’, ‘वसंतदादा’, ‘केन अॅग्रो’, ‘निनाईदेवी’, ‘विश्वासराव नाईक’ व सातारा जिल्ह्यातील ‘किसन वीर’, ‘किसन वीर- प्रतापगड’, ‘किसन वीर- खंडाळा’ कारखान्यांचा समावेश आहे.
दररोज ५० कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा
पहिल्या टप्प्यात सुनावणी पूर्ण झालेल्या ३९ कारखान्यांवर साखरजप्तीची कारवाई केली. उर्वरित कारखान्यांपैकी रोज ५० कारखान्यांना नोटिसा काढून त्यांची सुनावणी घेतली जाईल आणि त्यांच्यावरही ही कारवाई करण्याची तयारी साखर आयुक्तांनी केली आहे.
जिल्हाधिकारी आजपासून कार्यवाही करणार
साखर आयुक्तांनी महसूल कारवाईचे आदेश दिले आहेत. हे आदेश बुधवारी सकाळी संबंधित जिल्हाधिकाºयांना प्राप्त होणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होणार आहे.
या कारखान्यांवर कारवाई होणार
कोल्हापूर : दत्त-शिरोळ, जवाहर, पंचगंगा, शरद, वारणा, गुरुदत्त, संताजी घोरपडे, इको केन शुगर.
सांगली : महाकाली, वसंतदादा, केन अॅग्रो,
निनाईदेवी, विश्वासराव नाईक
सातारा : किसन वीर- भुर्इंज, किसन वीर- प्रतापगड,
किसन वीर- खंडाळा.
सोलापूर : विठ्ठल-पांडे, गोकुळ शुगर, कुरमदास, सिद्धेश्वर, बबनराव शिंदे, जयहिंद शुगर.
जळगाव : मधुकर. च्जालना : समृद्धी शुगर, रामेश्वर
बीड : माजलगाव, वैद्यनाथ, जय महेश शुगर, जय भवानी
परभणी : रेणुका शुगर, त्रिधारा शुगर.
उस्मानाबाद : शीला अतुल शुगर, शंभो महादेव.
लातूर : पानगेश्वर, श्री साईबाबा शुगर अहमदनगर : गणेश, डॉ. बी. बी. तनपुरे औरंगाबाद : शरद
नागपूर : वेंकेटेश्वरा