Kolhapur: भरधाव ट्रकची टेम्पोला पाठिमागून धडक, चार ठार; पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाठारजवळ अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 12:00 IST2024-03-18T11:58:51+5:302024-03-18T12:00:08+5:30
पेठवडगाव/नवे पारगाव/ कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर वठार तर्फ वडगाव येथे सेवा रस्त्यावर काँक्रीट मशीन लावताना भरधाव ट्रकने टेम्पोला पाठीमागून ...

Kolhapur: भरधाव ट्रकची टेम्पोला पाठिमागून धडक, चार ठार; पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाठारजवळ अपघात
पेठवडगाव/नवे पारगाव/कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर वठार तर्फ वडगाव येथे सेवा रस्त्यावर काँक्रीट मशीन लावताना भरधाव ट्रकने टेम्पोला पाठीमागून धडक दिली. रविवारी (दि. १७) रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार सेंट्रिंग कामगार ठार झाले, तर दोन महिलांसह आठजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. पेठ वडगाव पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले.
बाबालाल इमाम मुजावर (वय ५०), विकास धोंडीराम वड्ड (३२), सचिन धनवडे (४०) आणि श्रीकेश्वर पासवान (६०, सर्व रा. भादोले, ता. हातकणंगले) अशी मृतांची नावे आहेत. तर सचिन पांडुरंग भाट (वय ३०), कुमार तुकाराम अवघडे (४२), भास्कर दादू धनवडे (६०), सविता लक्ष्मण राठोड (१७), ऐश्वर्या लक्ष्मण राठोड (१५), लक्ष्मण मनोहर राठोड (४२) आणि सुनील कांबळे (सर्व रा. भादोले) हे जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातस्थळ आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, भादोले येथील सेंट्रिंग ठेकेदार बाबालाल मुजावर हे रविवारी ११ कामगारांना टेम्पोतून घेऊन कसबा बावडा येथील इमारतीच्या स्लॅबच्या कामासाठी गेले होते. काम संपल्यानंतर सायंकाळी सर्व कामगार काँक्रीट मशीन टेम्पोला जोडून वाठार येथे पोहोचले. वाठार येथील सेवामार्गालगत मशीन लावून ते टेम्पोने भादोले येथे जाणार होते.
मशीन लावण्याचे काम सुरू असतानाच पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने काँक्रीट मशीन आणि टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रस्त्यावर थांबलेले चार कामगार चिरडले गेले, तर टेम्पोतील कामगारही जखमी झाले. यातील सचिन धनवडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी सर्व जखमींना दोन रुग्णवाहिकांमधून तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, वाटेतच तिघांचा मृत्यू झाला. अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील भास्कर धनवडे यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पेठ वडगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रक चालकाला ताब्यात घेतले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
भादोले गावावर शोककळा
अपघातातील सर्व मयत आणि जखमी भादोले गावातील आहेत. यातील काही बाहेरच्या राज्यातील असून, कामाच्या निमित्ताने ते भादोले गावात राहतात. हातावर पोट असलेल्या कुटुंबांवर काळाने घाला घातल्यामुळे भादोले गावावर शोककळा पसरली. अपघातानंतर भादोले गावातील नागरिकांनी घटनास्थळी आणि सीपीआरमध्ये गर्दी केली.
बाप-लेकी बचावल्या
लक्ष्मण राठोड हे कामगार त्यांच्या सविता आणि ऐश्वर्या या दोन्ही मुलींसह टेम्पोत बसले होते. अपघातात तिघांच्या डोक्याला, हाताला, पाठीला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने टेम्पोत असल्यामुळे बाप-लेकी बचावल्या. राठोड कुटुंब मूळचे विजापूरचे असून, कामासाठी ते भादोले येथे राहते.
बापाला वाचवण्यात मुलाला अपयश
ठेकेदार बाबालाल मुजावर यांचा मुलगा रियाज याला अपघाताची माहिती मिळाली तेव्हा तो पेठ वडगावमध्ये होता. काही वेळातच तो मित्रासह अपघातस्थळी पोहोचला. काँक्रीट मशीनखाली अडकलेले त्याचे वडील मदतीसाठी धावा करीत होते. मुलगा रियाज याने धाडसाने मशीन बाजूला सारून वडिलांना बाहेर काढले. तातडीने रुग्णवाहिकेत घालून त्यांना सीपीआरमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांचा जीव वाचवण्यात त्याला यश आले नाही, त्यामुळे सीपीआरच्या आवारात तो धाय मोकलून रडत होता.
काळाचा घाला
आज अपघातात बळी गेलेले मजूर श्रमजीवी सामान्य कुटुंबातील होते. मोलमजुरी करूनच त्यांचा उदरनिर्वाह करणारे होते. काम आटोपल्यानंतर घरी जाण्याच्या तयारीत होते. तथापि उद्याच्या कामाचे नियोजन करत असताना अचानक काळाचा घाला बसला.
सेवामार्ग, चौकात अतिक्रमणे
वाठार येथील उड्डाणपुलाजवळच्या सेवारस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. तसेच चौकात, रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या गाड्यांची रेलचेल झाली आहे. संध्याकाळी ५ ते १० या सेवामार्गावर मोठी गर्दी असते. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करत नाहीत. स्थानिक पोलिस प्रशासन देखील कारवाई करत नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणांची बुजबुज वाढली आहे.
पादचाऱ्यावरही काळाचा घाला
रस्त्याने महामार्गावर जाणारा पादचारी श्रीकेश्वर पासवान हा ठार झाला. वाहन अपघाताबरोबरच रस्त्यावर चालणाराही या अपघातात बळी गेला. सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे, पण सेवामार्ग कोठेपर्यंत वाढणार आहे याची माहिती महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे सेवारस्त्याला घासून अनेक इमारती आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
सेंटरिंग स्लॅबसाठी भादोलेची ख्याती
भादोले हे जिल्ह्यात स्लॅप सेंटरिंग कामासाठी प्रसिद्ध आहे. येथील पाच-सात जणांच्या टीम या कामासाठी परिसरात प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यामध्ये कोठेही बांधकाम स्लॅब टाकायचा असेल तर भादोले गावची आठवण होते. याच गावातील काम आटोपून जाणाऱ्या या स्लॅब मजुरांवर काळाचा घाला बसला.