विनापरवाना फिरणाऱ्यांकडून ४ लाख ६६ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:26 AM2021-05-21T04:26:02+5:302021-05-21T04:26:02+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी कंबर कसली आहे. तरीही नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी कंबर कसली आहे. तरीही नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. दिवसभरात अशा फिरणाऱ्यांकडून विविध कारणांसाठी ४ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे तर १६८ वाहने जप्त केली असून, ७ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिवसभरात जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यात विनाकारण फिरणाऱ्या १,३४१ वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत २ लाख ९९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे तर १६८ वाहने जप्त केली असून, ७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांवर मोठी कारवाई होत असतानाही सलग दुसऱ्या दिवशी ३७५ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ९०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. विविध दुकाने व आस्थापना उघडी ठेवल्याबद्दल १८ आस्थापनांवर कारवाई करत त्यांच्याकडून २१ हजार ५०० रुपयांचा असा एकूण ४ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे.