बाटलीत आत्मा; नाग तुम्हाला त्रास देईल असे सांगून ४. ४० लाख उकळले, कोल्हापुरातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 07:04 PM2022-10-19T19:04:13+5:302022-10-19T19:04:39+5:30
‘तुला घरातील गुप्तधन मिळवून देतो, तुम्ही आमचे ऐकले नाहीतर घरामध्ये असलेला नाग तुम्हाला त्रास देऊ शकतो’, अशी भीती दाखवून वेळोवेळी पैशांची मागणी
कोल्हापूर : तुमच्या घरातील गुप्तधन मिळवून देतो, आम्ही सांगेल त्याप्रमाणे न वागल्यास घरातील नाग त्रास देईल, बाटलीत आत्मा आहे, अशी भीती दाखवून शुक्रवारपेठेतील महिलेस चार लाख ४० हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा ११ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
किशोर भगवान लोहार (पुलाची शिरोली, ता. हातकणंगले), नामदेव शामराव पोवार (रा. जोगेवाडी, ता. राधानगरी), बाळू रामचंद्र सुतार (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), अक्षय अनिल हेगडे (रा. कंदलगांव, करवीर), गजानन भगवान लोहार (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले), अनिल लक्ष्मण सुतार (रा. आळते, ता. हातकणंगले), नवनाथ शामराव सुतार (पुलाची शिरोली), शशिकांत कांबळे (रा. उजळाईवाडी), वैभव चौगुले (रा. जयभवानी गल्ली, कसबा बावडा), राजन (रा. पुलाची शिरोली), फडणीस महाराज (पूर्ण नाव नाही) अशी त्या संशयिताची नावे आहेत. महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. फसवणुकीची घटना शुक्रवारपेठ मृत आरती आनंद सामंत यांच्या घरी घडली होती.
पोलिसांनी सांगितले की, २३ डिसेंबर, २०२१ ते २९ सप्टेंबर, २०२२ या कालावधीत आरती यांना संशयित ११ जणांनी ‘तुला घरातील गुप्तधन मिळवून देतो, तुम्ही आमचे ऐकले नाहीतर घरामध्ये असलेला नाग तुम्हाला त्रास देऊ शकतो’, अशी भीती दाखवून वेळोवेळी पैशांची मागणी सुरू केली. तसेच घरात खड्डा खोदून त्यात नरबळी देण्यास सांगून बकऱ्याचा बळी दिला. यावेळी कणकेची बाहुली करून यात आत्मा आला आहे. तळ्याजवळ पूजा करून प्लास्टिकच्या बाटलीवर बाहुली ठेवली. बाटलीत आत्मा उतरवला आहे, असे सांगितले.
त्यानंतर घरात पूजा करण्यासाठी ग्रंथ व मुळ्या दिल्या. याची पूजा न केल्यास मृत्यू होईल, अशी भीती दाखवली. अशा प्रकारे संशयित या ११ आरोपींनी चार लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणूक केली. यासंबंधीची फिर्याद मृत आरती यांचे भाऊ फिर्याद निरंजन अनिल दीक्षित (रा. शुक्रवारपेठ, कोल्हापूर) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
३० सप्टेंबरला आरतीचा खून
गुप्तधन शोधाच्या तगाद्याला कंटाळून बालिंगा ते शिरोली दुमाला रोडवरील करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील शेतात आरती सामंत या महिलेचा ३० सप्टेंबर २०२२ रोजी राधानगरी तालुक्यातील जागेवाडी येथील मांत्रिक नामदेव शामराव पोवार याने खून केला. हा प्रकार उघडीस झाल्यानंतर तातडीने नामदेववर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली होती; पण आता नामदेवसह ११ जणांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे जादूटोणा प्रतिबंध कलमानुसार गुप्तधन मिळवून देण्याच्या आमिषाने आरतीकडून चार लाख ४० हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.