वळीव पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात चार कोटींचा वादळी तडाखा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:08 AM2018-05-12T01:08:30+5:302018-05-12T01:08:30+5:30
कोल्हापूर : गुरुवारी (दि. १०) सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसाने जिल्ह्यात अंदाजे ४ कोटी १ लाख ९२ हजार रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये घरांचे छत, जनावरांच्या गोठ्यांसह पोल्ट्रींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इचलकरंजीत ५० घरांसह एका मॉलचे अंदाजे दोन कोटींचे नुकसान झाले आहे.
भोगावती साखर कारखान्याची साखर व बगॅस भिजून एक कोटीचे तर यड्रावमध्ये सुमारे दोनशे घरांची पडझड होवून कोटयवधीचे नुकसान झाले. महसूल विभागाकडून या मालमत्ता नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. शहरात शुक्रवारी रणरणत्या उन्हाबरोेबरच दुपारनंतर ढगाळ वातावरण राहिले.
गुरुवारी सायंकाळी सुरू झालेला वळीव रात्री उशिरापर्यंत सुरू होता. हातकणंगले तालुक्यात हुपरी येथे पाच घरांची पडझड होऊन अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले. चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे सहा घरांची पडझड झाली. आजरा तालुक्यात धनगरवाडा गोठ्यात वीज पडून दोन म्हशी व एक रेडकू मृत झाले. तसेच भादवण, म्हागोंड, मलिग्रे, चितवडे येथे घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
‘महावितरण’लाही फटका
जिल्ह्यात विजेचे उच्च दाबाचे ११७ व लघुदाबाचे ४०७ खांब पडले. त्याचबरोबर ४२१ रोहित्रे बाधित झाली असून शुक्रवारी दिवसभरात यातील निम्म्याहून अधिक सुरू करण्यात आली. तसेच ३३ के.व्ही. लाईनच्या ३७ लाईन बाधित झाल्या. यातील ३३ लाईन शुक्रवारी पूर्ववत सुरू झाल्या, तर उर्वरित शिरदवाड, माणगाव, तांबाळे व कागल येथील लाईन दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर सुरू होते. तसेच शहरातील साकोली कॉनर येथीलही वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला.
नुकसानाची आकडेवारी
हातकणंगलेमध्ये ४८ घरांची पडझड होऊन ३५ लाख, बिरदेववाडीत ५० हजार, कुंभोज येथे एका घराची पडझड हाऊन ४५ हजार, रुई येथे १९ घरांची पडझड होऊन सव्वातीन लाख, साजणी येथे नऊ घरांची पडझड होऊन सात लाख, तिळवणी येथे सात घरे व एका पोल्ट्रीची पडझड होऊन १५ लाख, माणगाव येथे १० घरांची पडझड होऊन अडीच लाख, माणगाववाडी येथे आठ घरांची पडझड होऊ २ लाख, चंदूर येथे २० घरे व एक गोठ्याची पडझड होऊन २५ लाख, शहापूर येथे ४३ घरांची पडझड होऊन २५ लाख, तारदाळ येथे ६० घरे व दोन फळबागांची पडझड होऊन ३५ लाख, खोतवाडी येथे १५ घरांची पडझड होऊन १२ लाख, चोकाक येथे ५० हजार, अतिग्रे येथे दोन घरांची पडझड होऊन १ लाख २० हजार, हेर्ले येथे आठ घरांची पडझड होऊन आठ लाख ३५ हजार, हालोंडी येथे ४० हजार, माले येथे पाच घरांची पडझड होऊन
१ लाख ५० हजार, मुडशिंगी येथे एका घराची पडझड होऊन १ लाख ६० हजारांचे नुकसान झाले आहे.
इचलकरंजीत प्रचंड नुकसान; परिसर अंधारात
इचलकरंजी : वादळी वारा व पाऊस यामुळे शहर परिसरातील पडझडीने सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. तर घरांवरील पत्रे उडून गेल्याने माय-लेकी जखमी झाल्या आहेत. विद्युत तारा तुटून व खांब पडल्याने महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांमार्फत विद्युत जोडणीचे काम सुरू असून, २४ तासांत शहराच्या ५० टक्के भागात विद्युत पुरवठा सुरू केला. चंदूरसह उर्वरित भागात विद्युतपुरवठा सुरळीत होण्यास आणखी एक दिवसाचा कालावधी लागेल.
इचलकरंजीचे तलाठी सुनील खामकर यांच्यासह पथकाने दिवसभरात शहरातील ४५ पंचनामे केले. यामध्ये आसरानगर येथे घर पडले आहे. तर गावभाग मरगुबाई मंदिर परिसरातील एका घराचे पत्रे उडून गेल्यामुळे शांता भाऊसाहेब पाटील (वय ४४) व त्यांची मुलगी वर्षा प्रशांत जाधव (२४) या माय-लेकी जखमी झाल्या. त्यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवाहरनगर परिसरातील रमजान नदाफ यांच्या घराचे छत उडून दुसºयांच्या घरावर कोसळले. त्यामुळे तीन घरांचे नुकसान झाले. सांगली रोडवरील एका खासगी मॉलवरील सोलर पॅनेल व पत्रे उडून नुकसान झाले. येथीलच एका सायझिंगचेही नुकसान झाले आहे.
महावितरणचेही मोठे नुकसान झाले. अधीक्षक अभियंता एस. डी. म्हारूलकर यांनी शहरास भेट दिली. नुकसानीमध्ये ३३ केव्ही उच्चदाब लहरींचे वीस खांब पडले. तसेच उच्च मध्यम लहरीचे २९ व लघुदाब लहरीचे १०० असे एकूण १४९ खांब पडले आहेत.
यड्रावमध्ये दोनशेहून अधिक घरांची पडझड
यड्राव : गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाºयात येथील परिसरात दोनशे घरांची पडझड झाली आहे. यामध्ये सुमारे एक कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांना ठोस अश्वासन न मिळाल्यांने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
काही झाडे घरांवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या पडझडीत पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सुमारे शंभरहून अधिक घरे जमीनदोस्त झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अनेक घरांच्या छतावरील पत्र्याची छपरे उडून गेल्याने या घरातील सर्व साहित्यांची पावसामुळे नासधूस झाली आहे. उदय कुंभार यांचे गणेशमुर्तींचे शेड, महावीर घाट यांचे हरितगृहातील शेड वाºयाने फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर नरसू घाट यांची एक एकर केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. शुक्रवारी सकाळी तहसीलदार गजानन गुरव यांनी तीन पथके तयार करून सर्व नुकसानीची पाहणी करण्याची सूचना केली आहे. महावितरण, बांधकाम महसूल, कृषी विभाग या सर्व विभागांमार्फत संपूर्ण नुकसानीची तपासणी सुरु आहे.
वादळी वारा व पावसामुळे विद्युत तारा व खांब पडल्याने गुरुवारी रात्रीपासून यड्राव परिसर अंधारात आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नुकसानीची पाहणी आमदार उल्हास पाटील, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, सरपंच सुमन झुटाळ, उपसरपंच विजय पाटील आदिंसह अधिकाºयांनी केली.
‘भोगावती’ची साखर भिजली
आमजाई व्हरवडे : गुरुवारी झालेल्या वादळी पावसामुळे शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. साखरेसह बगॅस भिजला असून, मोलॅसिसचेही नुकसान झाले आहे.
यावर्षी जादा उत्पादनामुळे गोदामे पूर्ण क्षमतेने भरल्याने कारखान्याच्या आवारात साखरसाठा केला आहे. वादळी वाºयामुळे टोप व ताडपत्री उडून गेल्याने सुमारे साडेतीन हजार क्विंटल साखर भिजली आहे. या साखरेची किंमत सुमारे ७८ लाख रुपयांच्या आसपास आहे. सुमारे दीडशे टन बगॅस भिजला असून मोलॅसिसचेही मोठे नुकसान झाले आहे.