कोल्हापूरला ४० अंश सेल्सिअसचे चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:26 AM2019-04-26T00:26:53+5:302019-04-26T00:26:58+5:30
कोल्हापूर : शहरातील तापमानाने ४0 अंश सेल्सिअसवर झेप घेतल्याने एप्रिलमध्येच उन्हाचे चटके बसून, अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात झाली ...
कोल्हापूर : शहरातील तापमानाने ४0 अंश सेल्सिअसवर झेप घेतल्याने एप्रिलमध्येच उन्हाचे चटके बसून, अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पाऊस पडेल, असे वाटत होते. तरीही वळवाने हुलकावणी दिली.
गेल्या चार दिवसांपासून तापमानामध्ये वाढ होत आहे. किमान सकाळी ७ पर्यंत तरी हवेत थोडासा गारवा जाणवत होता. तोही नाहीसा झाल्याने रात्रीही नागरिकांना प्रचंड उकाडा सोसावा लागत आहे. गार वारे येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवल्या, तरी वारे गरमच येत असल्याचा अनुभव गेल्या चार दिवसांपासून येत आहे.
सकाळी आठनंतरच अंगातून घामाच्या धारा सुरू असून, सकाळी दहानंतर बाहेर पडायला नको वाटावे, अशी परिस्थिती आहे. सायंकाळी ५ वाजतादेखील अशीच परिस्थिती असून, ज्येष्ठ नागरिकांचेही फिरायला बाहेर पडण्याचे वेळापत्रक बदलले आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये दिसणारे चित्र आता कोल्हापुरात दिसायला सुरुवात झाली असून, अनेकजण डोक्यावर टोपी आणि तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडत आहेत. येत्या चार दिवसांत राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
गेल्या आठ-१0 दिवसांत एकीकडे उष्मा जाणवत असताना त्या तुलनेत जोरदार वळीव झालेला नाही; त्यामुळे हवेत प्रचंड उष्मा जाणवत आहे. या उष्म्यामुळे कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे.