Kolhapur Crime: तिप्पट फायद्याच्या आमिषाने क्रिप्टो करन्सीमध्ये ४० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 04:51 PM2023-02-14T16:51:48+5:302023-02-14T16:52:23+5:30
ऑक्टोबरपर्यंत बँक खात्यावर परतावे येत होते; परंतु त्यानंतर परतावे मिळण्याबाबत तक्रारी सुरु झाल्या.
कोल्हापूर : क्रिप्टो करन्सीमध्ये गुूंतवणूक करा..तुम्हाला ३०० दिवसांत तिप्पट फायदा करून देतो, असे सांगून इचलकरंजी, तारदाळ परिसरातील चौदा गुंतवणूकदारांची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार संबंधित गुंतवणूकदारांनी सोमवारी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे केली. अशाच प्रकारच्या फसवणुकीची तक्रार इचलकरंजीत शिवाजीनगर पोलिस ठाणे व गांधीनगर पोलिस ठाण्यातही झाली आहे. जिल्ह्यातील फसवणुकीचा आकडा काही कोटी रुपयांवर असण्याची शक्यता आहे.
डॉक्सी फायनान्स कंपनी स्थापन करून त्याआधारे इंद्रजित कोरे (रा.जयसिंगपूर), राजू पांगिरे, खलील पन्हाळकर व मोहसिन खुदावंत (रा.तिघेही इचलकरंजी) व अंजुम (रा.सांगली) अशी फसवणूक केलेल्यांची नावे आहेत. या कंपनीत गुंतवणूकदारांनी सरासरी १ लाख, ३ लाख, ५ लाख, ७ लाख ते १६ लाखांपर्यंत प्रत्येकी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये झाली.
त्यानंतर दिवसाला एक टक्का याप्रमाणे ऑक्टोबरपर्यंत बँक खात्यावर परतावे येत होते; परंतु त्यानंतर परतावे मिळण्याबाबत तक्रारी सुरु झाल्या. कंपनीची अडचण असून जानेवारीपर्यंत सर्व सुरळीत होईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु पैसे मिळायचे बंद झाल्यावर वारंवार हेलपाटे मारूनही पैसे परत मिळत नाही म्हटल्यावर गुंतवणूकदारांनी पोलिसांचा दरवाजा ठोठावला आहे.
स्वप्निल कुडाळकर, अनिकेत कुकरेजा, देविका सतराणी, एस.नरेश, सुरेश पटेल, संतोष पटेल, घनश्याम तारदाळकर, शशिकांत मुळे, राजेंद्र भस्मे, सचिन बी, संजय कोळी, संतोष पुजारी, विशाल गायकवाड, अझहर लासोटे, प्रकाश रावळ यांची फसवणूक झाली आहे. त्या सर्वांनी मिळून पोलिस अधीक्षक कार्यालयात येऊन फसवणुकीची तक्रार दिली.
गांधीनगरमधील जास्त लोक..
फसवणूक झालेल्यामध्ये गांधीनगरमधील जास्त लोक असल्याची माहिती पुढे आली आहे. हॉटेलमध्ये बोलावून कंपनीबद्दल माहिती देण्यात याच पाच लोकांचा समावेश होता. त्यांच्याविरुद्धच तक्रार देण्यात आली आहे.