लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी ४० लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:18 PM2019-03-12T13:18:43+5:302019-03-12T13:21:17+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामांसाठी राज्य शासनाकडून जिल्हा निवडणूक विभागाला नुकताच ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयांना लवकरच वितरण होणार आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामांसाठी राज्य शासनाकडून जिल्हा निवडणूक विभागाला नुकताच ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदार कार्यालयांना लवकरच वितरण होणार आहे.
हा निधी पहिल्या टप्प्यातील असून, अजून टप्प्याटप्प्याने उर्वरित निधी शासनाकडून दिला जाणार आहे. हे पैसे निव्वळ निवडणुकीच्याच कामावर खर्च करावे लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसीलदारांना लवकरच हा निधी वितरित केला जाणार आहे.
निवडणुकीच्या कामासाठी लागणारी मोठ्या प्रमाणातील स्टेशनरी खरेदी, निवडणूक कामासाठी उभारली जाणारी मंडप, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जेवण, नाश्ता, चहा त्याचबरोबर कार्यालयीन खर्च, निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या वाहनांचे भाडे, तसेच वाहनांमधील डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार आहे.
जिल्ह्याच्या मानाने हे पैसे अपुरे असले, तरी ते पहिल्या टप्प्यातील आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने जिल्हा निवडणूक विभागाला मिळणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या संमतीने राज्य शासनाने यासाठी निधीची तरतूद करून ही रक्कम निवडणूक विभागाला दिली आहे.
लोकसभा निवडणुकीतील प्रशासकीय खर्चासाठी राज्य शासनाकडून ४० लाख रुपयांचा निधी जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाला आहे. हा निधी फक्त निवडणुकीच्या प्रशासकीय कामासाठीच खर्च केला जाणार आहे. हा निधी पहिल्या टप्प्यातील असून, उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.
- दौलत देसाई, जिल्हाधिकारी