हमालीतील ४० पैसे आता महिला मजुरांना
By admin | Published: December 13, 2015 01:18 AM2015-12-13T01:18:18+5:302015-12-13T01:31:45+5:30
बाजार समिती : कांदा-बटाटा मार्केटमधील गुंता सुटला
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये महिला मजुरांच्या मजुरीवरून निर्माण झालेला गुंता अखेर शनिवारी सुटला. हमालीतील ४० पैसे कपात करून त्यामध्ये अडत्यांनी थोडे पैसे घालून महिलांंची मजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कांदा-बटाट्याचे सौदे पूर्ववत सुरू झाले.
कांदा-बटाटा मार्केटमध्ये सौद्यासाठी प्लॅटफॉर्मवर फोडलेली पोती परत भरण्यास हमालांनी नकार दिल्याने शुक्रवारी सौदे बंद होते. हमाली वाढवून दिल्याने समितीच्या नियमाप्रमाणे हमालांनीच काम करावे, अशी मागणी अडत्यांची होती; पण हे काम महिला मजुरांकडून आतापर्यंत करून घेत होता, मग आताच का नियमावर बोट ठेवता, असा पवित्रा घेऊन हमालांनी गोडावूनमध्येच सौदा काढावा, अशी मागणी केली. यामुळे शुक्रवारी सौदे बंद पडले होते. यावर शनिवारी काही दुकानात प्लॅटफॉर्मवर कांदा ओतला होता, तर काही ठिकाणी गोडावूनमध्ये ठेवल्याने शेतकरी पुन्हा समितीत आले.
त्यानंतर बाजार समिती सभापती परशराम खुडे, उपसभापती विलास साठे, सचिव विजय नायकल, सहायक सचिव मोहन सालपे, विभागप्रमुख, अडते, हमाल प्रतिनिधी यांच्याशी चर्चा झाली.
यामध्ये हमालांना प्रत्येक पोत्यामागे ४ रुपये ४० पैसे दिले जातात. त्यातील ४० पैसे कपात करून महिला मजुरांना द्यायचे, त्यामध्ये अडत दुकानदारांनी पैसे घालून सौद्यासाठी ओतलेली पिशवी भरण्याचे काम करणाऱ्या महिला मजुरांना पैसे द्यायचे, असा निर्णय घेण्यात आला. हा तोडगा अडते व हमालांना मान्य झाल्याने सौदे पूर्ववत सुरू झाले.