जिल्ह्यातील ४० शाळा अनुदानास पात्र
By admin | Published: August 11, 2015 12:44 AM2015-08-11T00:44:05+5:302015-08-11T00:44:05+5:30
शासनाचा निर्णय : आरक्षणानुसार भरतीची अट; अनेक वर्षांची अनुदानाची प्रतीक्षा संपणार
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४० शिक्षण संस्था अनुदानास पात्र ठरल्या आहेत. यामुळे अनेक वर्षांपासूनची अनुदानाची प्रतीक्षा संपणार आहे. शासन नियमानुसार त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ आॅगस्टला शासन निर्णय घेऊन पात्र संस्थांची नावे जाहीर केली आहेत. शासनाने २००१ मध्ये कायम विनाअनुदानित तत्त्वावर राज्यातील सुमारे दोन हजार प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना परवानगी दिली. यानंतर या शाळांकडून शासनाकडे अनुदानाची मागणी होऊ लागली. त्यामुळे शासनाने २००९ मध्ये ‘कायम’ शब्द वगळला. यानुसार २०१२-१३ पासून मूल्यांकनात निकष पूर्ण करणाऱ्या शाळा अनुदानास पात्र ठरविल्या जात आहेत. दरम्यान, शासन निर्णय १५ नोव्हेंबर २०११ नुसार मूल्यांकनासाठी अर्ज करताना शाळांमध्ये कर्मचारी नियुक्ती करताना आरक्षण धोरणाचा अवलंब करणे बंधनकारक केले. या शासन निर्णयाला विनाअनुदानित संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर सुनावणी होऊन, मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या तारखेपूर्वी आरक्षणाचा अवलंब केला नसल्यास अनुदानास अपात्र ठरविता येणार नाही, असा निर्णय ७ जानेवारी २०१५ रोजी उच्च न्यायालयाने दिला. यावर मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर आरक्षण धोरणाचा अंमल करणे बंधनकारक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित शिक्षण संस्थांची पुणे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीत पात्र असलेल्या शिक्षण संस्था अनुदानास पात्र ठरविल्या आहेत. पात्र ठरलेल्या शाळांना शासन नियमानुसार २०, ४०, ६०, ८०, १०० अशा टप्प्यांत अनुदान देण्यात येणार आहे.
अनुदानास पात्र शैक्षणिक संस्था
आदर्श विद्यालय इसापूर, आदर्श गुरुकुल विद्यालय पेठवडगाव, श्री शाहू विद्यालय कासारवाडा, माध्यमिक विद्यालय पाडळी, लक्ष्मीनारायण हायस्कूल पुंगाव, रोझरी शिक्षण प्रसारक मंडळाचे वाटंगी हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल नवीन राजापूर, पट्टणकोडोली, न्यू इंग्लिश स्कूल उंदरवाडी, माध्यमिक विद्यालय मोहाडे-चापोडे, न्यू माध्यमिक विद्यालय उचगाव, राष्ट्रीय विद्यालय तमदलगे, कवणे माध्यमिक विद्यालय, कै. दारकालिंग हायस्कूल शिंदेवाडी, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक माध्यमिक विद्यालय केंबळवाडी, सांगवडे माध्यमिक विद्यालय, नवे दानवाड हायस्कूल, न्यू हायस्कूल राशिवडे बुुद्रुक, महाराष्ट्र जमात जनता सेवक संघ पेठवडगाव, स्वामी समर्थ विद्यामंदिर कणेवाडी, शिवराय हायस्कूल सातर्डे, भगवानराव घाडगे हायस्कूल चिंचवाड, राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी, शिवराज विद्यालय महिपाळगड, ए. वाय. पाटील विद्यालय कानोली तर्फ असंडोली, दत्त विद्यालय हलसवडे, सह्याद्री विद्यानिकेतन माले, सिद्धेश्वर विद्यालय शिवारे-माणगाव, यशवंतराव भोसले विद्यालय खडकेवाडा, न्यू हायस्कूल हुपरी, माध्यमिक विद्यालय माळवाडी-कानोली, ज्ञानविज्ञान विद्यालय गणेशवाडी, कासारवाडी हायस्कूल, माध्यमिक विद्यालय दऱ्याचे वडगाव, प्रा. एन. डी. पाटील विद्यालय तळगाव, सौ. सुनीतादेवी सोनवणी ज्ञानगंगा हायस्कूल कोल्हापूर, स्वप्नजा विद्यालय आकुर्डे, वासनोली विद्यालय कुंभारवाडी.