जिल्हा परिषदेच्या ४० शाळा गळक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:29 AM2019-05-14T00:29:02+5:302019-05-14T00:29:07+5:30
रमेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी ...
रमेश पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : पावसाळा तोंडावर आल्याने करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या गळक्या व मोडतोड झालेल्या शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव करवीर पंचायत समितीकडे पाठविले आहेत. १७ जूनला शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी या शाळांची दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा मुख्याध्यापकांकडून व्यक्त होत आहे. या सर्व शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
तालुक्यात एकूण १७९ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये शिक्षकांची संख्या ११२७ इतकी आहे. तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या २८ हजार ९५७ इतकी आहे. दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येकवर्षी वाढत असताना काही वेळा या गळक्या शाळेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थित राहण्यावर होतो. त्यामुळे शाळा दुरुस्तीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
याबाबत शिंगणापूर येथे नुकतीच करवीर तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांची विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीतील चर्चेदरम्यान पावसाळा तोंडावर आल्याने शाळांची दुरुस्ती व त्यासाठी लागणारा निधी यावर चर्चा झाली. त्यात ४० शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेची सद्य:परिस्थिती कथन करून या शाळा दुरुस्त करून मिळाव्यात, अशी मागणी लेखी स्वरूपात गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली.
या शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषद स्वनिधी व जिल्हा नियोजन समिती या तीन विभागांकडून निधी प्राप्त होतो. सध्या पंचायतीकडे शाळा दुरुस्तीसाठी ४० प्रस्ताव आले आहेत. त्यातील सर्व शिक्षा अभियान, मुंबई यांच्याकडे १८ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर या शाळांची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तसेच काही शाळांची दुरुस्ती १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहेत. काही ग्रामपंचायतींनी सध्या शाळा दुरुस्तीची कामे हाती घेतलेली
आहेत.
तालुक्यात सध्या मोडकळीस आलेल्या व २५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या, तसेच शिवाजी विद्यापीठाकडून केलेल्या स्ट्रक्चर आॅडिटमध्ये नवीन शाळा उभारण्यासाठी प्रमाणपत्र दिलेल्या ११ शाळांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यात कोथळी पासार्डे, मांढरे , शिंगणापूर, गांधीनगर या शाळांना मंजुरी मिळाली आहे. तर कन्या उचगाव, कुमार वाशी, माळुंगे, धोंडेवाडी या शाळांच्या मंजुरीची प्रक्रिया सध्या सुरू
आहे.