४० हजार गणेशमूर्ती, १४० टन निर्माल्य दान
By admin | Published: September 23, 2015 12:23 AM2015-09-23T00:23:26+5:302015-09-23T00:24:34+5:30
पर्यावरणपूरक गणेशोत्सव : महापालिका व समाजसेवी संघटनांच्या प्रयत्नांना यश
कोल्हापूर : दुष्काळाची गंभीरता आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून कोल्हापूरकरांनी दान केलेल्या ४० हजार २५० गणेशमूर्ती मंगळवारी महापालिकेच्यावतीने इराणी खणीत विसर्जित करण्यात आल्या, तर १४० टन निर्माल्य खत निर्मितीसाठी पाठविण्यात आले. घरगुती गणेशमूर्तींचे सोमवारी विसर्जन झाले. पुरोगामी कोल्हापूरचा वारसा जपत नागरिकांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी गणेशमूर्ती पंचगंगा नदी किंवा तलावासारख्या जलाशयात विसर्जित न करता त्या दान केल्या.
यामध्ये विभागीय कार्यालयांतर्गत गांधी मैदान येथे ११ हजार चाळीस, शिवाजी मार्केट येथे ७ हजार ९२०, राजारामपुरीत ५ हजार ५६०, ताराराणी मार्केट येथे ८ हजार २३०, अशा एकूण ३२ हजार ७५० गणेशमूर्ती कृत्रिम कुंड, काहिलींमध्ये विसर्जित करण्यात आल्या, तसेच ग्रामीण भागातील गोकुळ शिरगाव, कुशिरे, पोहाळे, केर्ले, माजगाव, पाचगाव या भागातील नागरिकांनी ७ हजार ५०० गणेशमूर्ती दान केल्या. अशा एकूण ४० हजार २५० गणेशमूर्ती महापालिकेच्यावतीने एकत्र करून इराणी खण व
शेजारील खणीमध्ये विसर्जन करण्यात आल्या.
नागरिकांनी शंभर टक्के निर्माल्य दान केल्याने त्याची आकडेवारी १४० टनांवर गेली. या निर्माल्यातून फुले, फळे, प्रसाद, कापसाचे वस्त्रमाळ, आणि प्लास्टिकचे विलिगीकरण करण्यात आले. प्लास्टिक पुनर्निर्मितीसाठी पाठविण्यात आले आहे तर निर्माल्य बावड्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात तसेच एकटी संस्थेच्या मौजे नंदवाळ फाटा येथील जागेत खत निर्मितीसाठी पाठविण्यात आले आहे. मोहिमेत महापालिकेच्या पवडी विभागाचे दोनशे कर्मचारी, आरोग्य विभागाचे शंभर व इतर विभागांचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, शंभर ट्रॅक्टर, १० डंपर व ४ जेसीबी अशी यंत्रणा तैनात होती.
रंकाळ्यातील विसर्जित गणेशमूर्ती इराणी खणीत
महापालिका व समाजसेवी संघटनांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत रंकाळ्यात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती काढून त्या पुन्हा इराणी खणीत पर्यावरणप्रेमींनी विसर्जित केल्या. मंगळवारी सकाळीच निसर्गमित्र धनंजय नामजोशी यांच्या नियोजनाखाली दत्त तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ येथील २५ हून अधिक तरुणांनी या विसर्जित गणेशमूर्ती पाण्यातून बाहेर काढायला सुरुवात केली. सकाळी सात वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत जवळपास सहाशेहून अधिक गणेशमूर्ती रंकाळ्यातून बाहेर काढण्यात आल्या.
मूर्तिदान आता बनली जनचळवळ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांनी पाणी प्रदूषण टाळून मोठ्या प्रमाणावर मूर्ती व निर्माल्य दान केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भाविकांचे अभिनंदन केले आहे. जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी त्यासंबंधीचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. अंनिस, शिक्षण विभाग, महापालिका व समविचारी पक्ष संघटनांनी मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. कालबाह्य रूढी, प्रथांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते हे टाळूनही सण साजरे करू शकतो. धर्माची विधायक चिकित्सा समाजास पुढे नेणारी आहे. सुरुवातीस धर्मांध प्रवृत्तींनी या उपक्रमास तीव्र विरोध केला. लोकांनी दान केलेल्या मूर्ती वाहत्या पाण्यातच सोडा, असाही आग्रह धरला. विज्ञानवादी कार्यकर्त्यांशी वाद घातले, परंतु आता मूर्ती दान व निर्माल्य दान ही जनचळवळ झाली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यात प्रसारमाध्यमांचे मोलाचे सहकार्य लाभले.