पाण्याअभावी ४०० एकरांतील ऊस वाळला
By admin | Published: April 18, 2016 09:34 PM2016-04-18T21:34:09+5:302016-04-19T01:02:56+5:30
करवीर तालुका : उन्हामुळे पिकांना अपुरा पाणीपुरवठा; आडसाली ऊस लागण, खोडवा, बोडवा पिकांना फटका
शिवराज लोंढे-- सावरवाडी--अपुरा पाऊस, दुष्काळजन्य परिस्थितीचे चित्र, वाढीव वीजभार नियम, शेतीसाठी पाणी उपसाबंदी, सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या पाणीपुरवठा संस्थेचे ढासाळलेले पाणी वाटप व्यवस्थापन, या सर्व पार्श्वभूमीवर यंदा ऐन उन्हाळ्यामध्ये करवीर तालुक्यात शेतीला अपुरा पाणीपुरवठा होऊ लागल्याने तालुक्यात ४०० एकर ऊस क्षेत्रातील ऊस पिके पाण्याअभावी करपू लागल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे.यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीनुसार धरणक्षेत्रात पाण्याचा साठा कमी पडू लागला आहे. शेतीला उन्हाळ्यामध्ये अपुरा पाणीपुरवठा होऊ लागला आहे. वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा आणि पाणी उपसाबंदीमुळे पाण्याचे नियोजन बिघडले आहे. यावर्षी शेती व्यवसायासमोर पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न उभारला आहे. मार्च ते जून महिन्यात शेतीला पाणीपुरवठा व्यवस्थित होणार नसल्यामुळे आडसाली ऊस लागण, खोडवा, बोडवा या ऊस पिकांना यंदा जबर पाणीपुरवठ्याचा फटका सोसावा लागणार आहे. शेतीला पाणीच मिळत नसल्यामुळे शेतीच्या उत्पादन क्षमतेत घट होणार आहे. नदीवरील पाणी उपसा कालावधीत दहा दिवस चालू व दहा दिवस बंद असा असल्यामुळे या कालावधीत शेतीस पाणीपुरवठा होऊ शकत नाही. तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असल्यामुळे शेती पिकांना जादा पाणी लागते; पण सध्या अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाण्याचा पाणी वापरातील फेर वेळेत येत नाही.ग्रामीण भागातील सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या पाणीपुरवठा संस्था ठरावीक राजकीय गटाच्या बनल्याने शेतीच्या पाणीपुरवठ्यामध्ये सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. पाणी वापरात राजकारण शिरल्यामुळे गटातटातील शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही. शिवाय शेती पिके वाळवून पाणी देण्याची प्रथा पाणीपुरवठा संस्थेकडून सुरू झाल्याने पाणीपुरवठा संस्थेच्या कारभाराबाबत ग्रामीण भागात तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. रात्रपाळीमध्ये पाण्याचा गैरवापर होणे, पाणी वाया जाणे यासारख्या प्रकारामुळे पाणीपुरवठा संस्थांचे नियोजन कोलमडले आहे. पाणी वाटपात वशिलेबाजी सुरू झाली आहे. पाणीपुरवठा संस्थेच्या कर्मचारी वर्गाकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. मुद्दाम ऊस पीक वाळवून पाणी देण्याचे प्रकार घडू लागल्याने पाणीपुरवठा संस्थेच्या कारभाराची शासनाने अथवा सहकार खात्याने चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गांतून होऊ लागली आहे. सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा हंगाम सुरू असल्यामुळे भोगावती, तुळशी नद्यांच्या पात्रात पाणी असूनही शेतीला हंगामानुसार पाणी मिळत नाही. पाण्याअभावी भुईमूग, मका, मिरची, तीळ यासारखी पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. खोडवा, आडसाली लागण व बोडवा ही ऊस पिके करपू लागल्याचे ऊस वाढीवर गंभीर परिणाम होऊ लागल्याने पुढील वर्षाच्या साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामावर ऊसटंचाईचा प्रश्न भेडसावणार आहे.
शेती व्यवसायासमोर सध्या पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणीपुरवठा संस्थांद्वारे शेतीस अपुरा पाणीपुरवठा होतो. यामुळे ऊस पिकांचे नुकसान होते. याला जबाबदार कोण? शेतकऱ्यांना मोफत पाणी उपसा परवाने राज्य शासनाने त्वरित द्यावेत. तसेच पाणीपुरवठा संस्थेची चौकशी करणे गरजेचे आहे.
पाणी उपसा परवाने देण्याची गरज
पाण्याचा दुरूपयोग टाळण्याबरोबरच शेती पिकांना मुबलक पाणी मिळण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना नदीवरून पाणी पुरवठ्यासाठी पाणी उपसा परवाने देणे गरजेचे आहे.
त्यामुळे पाण्याचा
वेळेवर वापर शेतकऱ्यांना करता येईल. शिवाय पाणीपुरवठा संस्थेच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
करवीर तालुक्यात ऊस पिके पाण्याअभावी करपू लागल्याने शेतकरी चिंतातूर आहे.
- दादासाहेब देसाई,
भाजप प्रणीत शेतकरी आघाडी,
करवीर तालुका अध्यक्ष