तीन मुलींच्या विवाहासाठी ४०० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 10:33 PM2017-07-29T22:33:06+5:302017-07-29T22:34:08+5:30
कोल्हापुरातील बालकल्याण संकुल : मुलांचे लग्न जमविणे झाले कठीण
इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुलींची कमी संख्या आणि वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचे विवाह जमविणे ही सध्या मोठी समस्या झाली आहे. येथील बालकल्याण संकुलातील मुलींशी विवाह करण्यासाठी ४०० मुलांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे, सध्या केवळ तीनच मुली बोहल्यावर चढण्यास तयार असून, त्यांना ४०० उपवरांमधून भावी पतीदेवांची निवड करावी लागणार आहे.
मंगळवार पेठेतील ‘बालकल्याण संकुला’मधील संस्थेत नवजात बाळापासून ते अठरा वर्षांपर्यंतची २०० मुले-मुली राहतात. अठरा वयापुढील मुलींसाठी आधारगृह चालविले जाते. सध्या येथे अठरा ते बावीस वयोगटातील २२ मुली आहेत. त्यांपैकी १९ मुली वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत; तर तीन मुलींचे शिक्षण पूर्ण झाले असून, त्यांनी विवाहासाठी तयारी दर्शविली आहे. या तीन मुलींना ४०० अर्जांतून आपल्यासाठी सुयोग्य वराची निवड करावी लागणार आहे.
साधारणत: १९८५ साली संस्थेतील पहिल्या मुलीचे लग्न झाले. त्यानंतर आजपर्यंत ७० मुलींचे विवाह झाले असून, त्या सुखाने संसार करीत आहेत. संस्थेतील किमान तीन-चार मुलींचे वर्षाला विवाह होतात. त्यांचा सगळा खर्च संस्था आणि देणगीदारांतर्फे केला जातो.
अशी होते वराची निवड...
मुलाने निर्व्यसनी असले पाहिजे, कुटुंब सुशिक्षित व अनाथ मुलीचा मनापासून स्वीकार करणारे असले पाहिजे, स्वत:चे चांगले घर हवे, नोकरी सरकारी किंवा खासगी असली तरी चांगला पगार हवा, शेती असेल तर उत्तमच; किंवा आणखी काही संपत्ती असणे अपेक्षित आहे. या अपेक्षेनुसार आलेल्या अर्जांमधून मुलीसाठी योग्य ठरू शकतील अशा पाच-सहा मुलांचे अर्ज मुलीला दिले जातात. त्यातून मुलगी एक-दोन स्थळांची निवड करते. त्यानंतर संबंधित कुटुंबाला हे कळवून मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो. दोघांकडून होकार आला की मुलीसोबत संस्थेचे पदाधिकारी जाऊन मुलाचे घर, परिसर, गाव बघून येतात. त्याला मुलीकडून होकार आला तरच पुढची बोलणी होतात. मुलगा-मुलगीची आरोग्य तपासणी करून तिचा अहवाल, मुलाच्या संपत्तीची कागदपत्रे, मुलाचे व आई-वडिलांचे संमतीपत्र व विवाहाचा प्रस्ताव महिला व बालकल्याण विभागाला पाठविला जातो. त्यांच्या शंकांचे निरसन झाले की विवाहाला मान्यता मिळून संस्थेत थाटात लग्न लावून दिले जाते.
ही संस्था म्हणजे मुलींचे माहेरच आहे. तिला स्वयंपाकापासून ते आर्थिक व्यवहार, संसार चालविण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी शिकविल्या जातात.
- पद्मजा तिवले, मानद कार्यवाह, बालकल्याण संकुल