बाजार समितीत १४ हजार कांदा पोत्यांची आवक : राज्यातील इतर समित्यांपेक्षा दर चढाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 02:02 PM2020-02-01T14:02:51+5:302020-02-01T14:06:59+5:30
अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने खरिपातील कांद्याचे पीक अडचणीत आले, कांद्याचे उत्पादन कमी झाले आणि मागणी वाढल्याने बाजारात कांद्याचे दर गगनाला भिडले. किरकोळ बाजारात कांदा १५० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. मात्र गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर बाजार समितीत कांद्याच्या आवकेत वाढ झाली असून, शुक्रवारी तब्बल १४ हजार पोत्यांची आवक झाली. सरासरी दर प्रतिकिलो २६ रुपये झाला असला तरी राज्यातील इतर समित्यांच्या तुलनेत दर चढाच राहिला आहे.
अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने खरिपातील कांद्याचे पीक अडचणीत आले, कांद्याचे उत्पादन कमी झाले आणि मागणी वाढल्याने बाजारात कांद्याचे दर गगनाला भिडले. किरकोळ बाजारात कांदा १५० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. मात्र गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. नवीन कांदा बाजारात आल्याने आवक वाढली आहे. समितीत गुरुवारी तब्बल २१ हजार ५०२ पोत्यांची आवक झाली. त्यामुळे दरात काहीशी घसरण झाली असून, सरासरी २० रुपये किलोपर्यंतच दर राहिला. शुक्रवारी १४ हजार २४१ पोत्यांची आवक होऊन दर २६ रुपयांपर्यंत राहिला.
- राज्यातील इतर बाजार समित्यांपेक्षा हा दर चढाच राहिला आहे. शुक्रवारी लासलगाव बाजार समितीतीत १२ हजार पोत्यांची आवक होऊन सरासरी दर २६ रुपये राहिला. ‘मनमाड’, ‘पुणे’, ‘ अमरावती’, ‘देवळा’ या बाजार समितीत सरासरी १७.५० ते २५ रुपये किलोपर्यंत दर मिळाला.
शेतातून थेट बाजारात कांदा
शेतकरी खरीप हंगामातील कांदा चाळीत ठेवून नंतर बाजारात आणतो. मात्र या वर्षी कांद्याने उसळी खाल्ल्याने चाळीत कांदा राहिलाच नाही. शेतातून थेट तो बाजारात आला.
- कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात
यंदा कधी नव्हे इतका कांद्याला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यांत आवक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- शुक्रवारी राज्यातील बाजार समित्यांतील कांद्याचे दर
बाजार समिती आवक पोती सरासरी दर प्रतिकिलो
लासलगाव १२ हजार २६ रुपये
कोल्हापूर १४ हजार ३७ २६ रुपये
मनमाड ८ हजार ५०० २५ रुपये
पुणे २६ हजार ६०० २० रुपये
अमरावती ४१५ १७.५० रुपये
देवळा ५ हजार ३५० २३.५० रुपये