ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४ हजार पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 01:03 PM2021-01-14T13:03:41+5:302021-01-14T13:06:05+5:30
gram panchayat Election Police Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अधिकारी, कर्मचारी असा ३ हजार ८०६ जणांचा कडक बंदोबस्त गावागावात नेमला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात १,१०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अधिकारी, कर्मचारी असा ३ हजार ८०६ जणांचा कडक बंदोबस्त गावागावात नेमला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात १,१०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून भयमुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी गावे, मतदान केंद्रे, संवेदनशील गावे, मतदान केंद्रे आदींचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाईसाठी १५१ (३) व १४४नुसार ९३ प्रस्तावानुसार लोकांची यादी तयार केली आहे. त्यांच्यावर कडक नजर ठेवण्यात आली आहे. साडेचारशे लीटर दारुही जप्त केली आहे. दारुबंदी अंतर्गत ११६ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर ९४२ परवानाधारकांची शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी बुधवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
असा असेल फौजफाटा...
- पोलीस अधीक्षक -०१
- अतिरिक्त पोलीस अधीक्षक-०२
- परिक्षेत्रीय पोलीस अधीक्षक - ०१
- उपअधीक्षक - ०६
- पोलीस निरीक्षक - २२
- सहायक व पोलीस उपनिरीक्षक - ७८
- पोलीस अंमलदार - २३०६
(पुणे शहर पोलीस दलातील १५० व लोहमार्ग पोलीस मुंबईतील ५० अंमलदार) - गृहरक्षक दलाचे जवान - १४०७
- एसआरपीएफची कंपनी - ०१
संवेदनशील गावात बंदोबस्त
अतिसंवेदनशील गावासह ८८ गावांची यादी करण्यात आली आहे. या गावांमध्ये एक अधिकारी व दहा कर्मचारी असा विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या गावांमध्ये उपअधीक्षकांसह पोलीस निरीक्षकांनी अचानक भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. पैसे वाटपासारखे अनुचित प्रकार रोखण्यासाठी तत्काळ गुन्हे दाखल करण्याचेही आदेश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.