कांदा अनुदानाचे ४ हजार प्रस्ताव पात्र, अडीच कोटी अनुदान मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 02:00 PM2019-02-04T14:00:22+5:302019-02-04T14:01:55+5:30
राज्य सरकारच्या कांदा अनुदान योजनेत कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील ३९७७ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात १ लाख २९ हजार ५१९ क्विंटल कांद्याची विक्री केली असून, त्यांचा २ कोटी ५९ लाख ३ हजार रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव तयार केला आहे. आज, सोमवारी समिती प्रशासन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे अनुदानाचा प्रस्ताव सादर करणार आहे.
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कांदा अनुदान योजनेत कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील ३९७७ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात १ लाख २९ हजार ५१९ क्विंटल कांद्याची विक्री केली असून, त्यांचा २ कोटी ५९ लाख ३ हजार रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव तयार केला आहे. आज, सोमवारी समिती प्रशासन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे अनुदानाचा प्रस्ताव सादर करणार आहे.
नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरअखेर कांदा विक्री केली आहे, त्यांच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश सरकारने बाजार समित्यांना दिले होते.
त्यानुसार कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीकडे या काळात ४००४ शेतकऱ्यांनी १ लाख २९ हजार ५१९ क्विंटल कांद्याची विक्री केली आहे. या प्रस्तावांची लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये ३९७७ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना २ कोटी ५९ लाख ३ हजार ८०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
पात्र शेतकऱ्यांचे प्रस्ताव आज जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविले जाणार आहेत. त्यानंतर ते पणन मंडळाच्या माध्यमातून पुढील कार्यवाही होणार आहे. दरम्यान, सरकारने कांदा विक्रीची मुदत १५ डिसेंबर ऐवजी आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याची सूचना बाजार समित्यांना दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे.