Kolhapur News: इचलकरंजीत मंजुरीपेक्षा ४२ टक्के पोलिस कमी, गुन्हेगारीचा आलेख पाहता संख्या तोकडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 01:10 PM2023-01-03T13:10:45+5:302023-01-03T13:11:10+5:30

अतुल आंबी इचलकरंजी : शहरातील तीन पोलिस ठाणे, वाहतूक शाखा असे सर्व मिळून २८९ पोलिस मंजूर आहेत. त्यात ११९ ...

42 percent less police than sanctioned in Ichalkaranjit Kolhapur district | Kolhapur News: इचलकरंजीत मंजुरीपेक्षा ४२ टक्के पोलिस कमी, गुन्हेगारीचा आलेख पाहता संख्या तोकडी

संग्रहीत फोटो

googlenewsNext

अतुल आंबी

इचलकरंजी : शहरातील तीन पोलिस ठाणे, वाहतूक शाखा असे सर्व मिळून २८९ पोलिस मंजूर आहेत. त्यात ११९ पोलिस कमी असल्याने हजर असलेल्या १७० पोलिसांवरच कामाचा बोजा पडत आहे. त्यात साप्ताहिक सुटी, रजा, प्रतिनियुक्ती व आजारी रजा असे पोलिस वजा केल्यास नियमित कामात येणारी संख्या अतिशय तोकडी पडत आहे. औद्योगिक शहर असल्याने येथील गुन्हेगारीचा आलेख पाहता शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

सरकारकडून नेहमी पोलिस दलातील सुधारणेविषयी आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात मात्र अत्यंत कमी मनुष्यबळावर पोलिस दलास आपले कर्तव्य बजवावे लागत आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढून अनेक पोलिसांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यात जनताभिमुख पोलिसिंगमुळे पोलिसांचा वट कमी झाल्याचे दिसत आहे. पूर्वी एखादा दुसरा पोलिस दिसला, तरी जमाव संयमात राहत होता. आता मोर्चा, आंदोलने यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागतो. त्याचबरोबर गुन्हेगारी कृत्य करणारेही राजकीय पाठबळ घेऊन वावरत असल्याने पोलिसांना तारेवरची कसरत करत त्यांना गुन्ह्यात हाताळावे लागते.

वस्त्रोद्योग नगरीच्यानिमित्ताने देशभरातील विविध राज्यांतून नागरिक या शहरात येऊन राहतात. त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे तसेच त्याठिकाणाहून हद्दपार झालेले असे लोक येथे आपले गुन्हेगारी साम्राज्य निर्माण करण्यासाठी हालचाली करतात. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. सध्या इचलकरंजीसहकोल्हापूर जिल्हा व राज्यातील पोलिस संख्या कमीच आहे. परंतु इचलकरंजीची संवेदनशीलता व गुन्हेगारी पाहता शहरात तीनही पोलिस ठाण्यांत आवश्यक पोलिस नियुक्त करणे गरजेचे आहे.

पोलिस उपअधीक्षक पदही रिक्त

वस्त्रनगरीच्या राजकीय, औद्योगिक व गुन्हेगारीचे चित्र पाहता याठिकाणी खमक्या अधिकाºयाची गरज आहे. सर्व पोलिस ठाण्यांवर नियंत्रण ठेऊन योग्य काम करून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले उपअधीक्षकपदही दोन महिने झाले रिक्त आहे.  
 
पोलिस ठाणे      मंजूर       हजर      प्रतिनियुक्ती     कमी
शिवाजीनगर -      ८६          ६१            ८                    ५३
गावभाग -            ९४          ४३            ०                    ५१
शहापूर -             ७५          ३७            ०                    ३८
वाहतूक शाखा     ३४           २९            ०                    ५

Web Title: 42 percent less police than sanctioned in Ichalkaranjit Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.