जतजवळील ४२ गावांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा
By Admin | Published: June 16, 2015 01:13 AM2015-06-16T01:13:06+5:302015-06-16T01:15:03+5:30
पाणीप्रश्न पेटणार : नाहरकत प्रमाणपत्राची शासनाकडे मागणी
जत : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेतून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी गेल्या पाच वर्षापासून केली जात आहे. याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने या ४२ गावांना कर्नाटकात जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नाहरकत प्रमाणपत्र (एन. ओ. सी) द्यावे, अशी मागणी पाणी संघर्ष समितीने केली आहे.
जत तालुका सांगली जिल्ह्यात भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आले आहे.पश्चिम भागात पाणी आल्यामुळे पूर्व भागातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी ४२ गावांतील नागरिकांनी पाणी संघर्ष समितीची स्थापना करून शासनदरबारी या मागणीचा पाठपुरावा सुरु ठेवला.
वेळोवेळी उपोषण, मोर्चा, रास्ता रोको आंदोलन, चर्चासत्र, पदयात्रा काढून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी त्यांनी लोकवर्गणी जमा केली आहे.
लोकसभा निवडणुकीत पाणी संघर्ष समितीने खा. संजय पाटील यांना पाठिंबा देऊन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार केला होता. त्यावेळी पाणी देण्याचे आश्वासन संजय पाटील यांनी दिले होते. विधानसभा निवडणुकीत समितीने आमदार विलासराव जगताप यांना पाठिंबा दिला होता. त्यांनीही ४२ गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करु व पाणी देऊ, असे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुका होऊन वर्ष, तर विधानसभा निवडणुका होऊन सहा महिने झाले आहेत. परंतु पाणी संघर्ष समितीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे पूर्व भागातील नागरिक आक्रमक झाले आहेत. (प्रतिनिधी)
कर्नाटकात जाण्यास नाहरकत
जत तालुका महाराष्ट्र -कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. सीमा भागापासून यात सुमारे दोन किलो मीटर आत कर्नाटक राज्यातून तुबची - बबलेश्वर योजनेचा कालवा गेला आहे. तेथून सायफन (उताराने) पध्दतीने पाणी जत तालुक्यातील बोर नदीच्या पात्रात व तेथून संख (ता. जत) मध्यम प्रकल्पात येणार आहे.
जत तालुक्यातील आठ दहा साठवण तलाव भरुन झाल्यानंतर हे पाणी परत चडचण (कर्नाटक) येथे जाणार आहे. त्यामुळे जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना म्हैसाळ ऐवजी कर्नाटकातून पाणी देणे सोईचे होणार आहे.