कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या ४३ कोटींच्या कामांना 'गती' गरजेची, प्रवाशांची होतेय गैरसोय
By संदीप आडनाईक | Published: December 8, 2023 04:09 PM2023-12-08T16:09:50+5:302023-12-08T16:10:23+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्समधील रेल्वेस्थानकाचा तोंडवळा येत्या सहा महिन्यात बदलणार आहे. मात्र, ...
संदीप आडनाईक
कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्समधील रेल्वेस्थानकाचा तोंडवळा येत्या सहा महिन्यात बदलणार आहे. मात्र, दिलेला वेळ आणि प्रत्यक्ष सुरु असलेला वेग पाहता या कामाला किमान वर्ष लागण्याची शक्यता आहे. महिन्यापूर्वी जरी हे काम सुरु केले असले तरी फक्त पाडकामच झाले आहे. यामुळे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांना सध्या तरी अडथळ्याशीच सामना करत फलाटावर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी ४३ कोटी ३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन ६ ऑगस्ट रोजी झाले. हे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याची अट आहे. पुण्याच्या दर्शन मालू यांच्या कंपनीला या कामाची वर्कऑर्डर मिळालेली आहे. त्यांनी सांगलीच्या रोहित बेडगकर या उपठेकेदाराला तत्काळ कोल्हापूरचे काम सुरु करण्यास सांगितले. त्यानुसार हे काम १ नोव्हेंबर रोजी सुरु झाले आहे.
गतवर्षी २५ लाख खर्चून नव्याने बांधलेले शौचालय चारच महिन्यात पाडून तेथे प्रतिक्षालय, मुख्य प्रवेशद्वार, त्याचे सीलिंग आणि तिकिट बुकिंग काउंटरचे काम सुरु केले आहे. मात्र, सध्याच्या प्रवेशद्वारासमोर आणि रेल्वे स्टेशन बसस्थानकाच्या बाजूच्या सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या कार्यालयाच्या इमारतीसमोरील जागेत खोदल्याने प्रवाशांना मागेच उतरुन चालत कसरत करत फलाटावर पोहोचावे लागत आहे. या ठिकाणांहून वाहन आत आणता येत नाही. फक्त रिक्षा आत येउ शकतात.