Kolhapur: आजरा एमआयडीसीसाठी आणखी ४३ एकर जागा, कृषी विभागाचे आदेश

By समीर देशपांडे | Published: September 7, 2024 12:10 PM2024-09-07T12:10:05+5:302024-09-07T12:10:58+5:30

नारायण बागेतील जमीन देण्यास शासनाची मान्यता

43 more acres of land for Ajara MIDC Kolhapur district, Agriculture Department orders | Kolhapur: आजरा एमआयडीसीसाठी आणखी ४३ एकर जागा, कृषी विभागाचे आदेश

Kolhapur: आजरा एमआयडीसीसाठी आणखी ४३ एकर जागा, कृषी विभागाचे आदेश

समीर देशपांडे

कोल्हापूर : शासनाच्या धोरणात्मक निर्णयाला अपवाद करून आजरा एमआयडीसीसाठी नारायण बागेतील ४३ एकर जमीन उद्योग विभागास हस्तांतरित करण्यात आली आहे. याबाबत कृषी विभागाने गुरुवारी शासन आदेश काढला असून यामुळे आजरा तालुक्यातील उद्योग आणि कारखानदारीला चालना मिळणार आहे. या बागेतील जमीन कोणत्याही परिस्थितीत हस्तांतरित केली जाऊ नये, असे स्पष्ट आदेश असताना अपवाद म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.

आजरा शहराच्या वरच्या बाजूला आंबोली रस्त्यावर ही नारायण बाग आहे. या ठिकाणी तालुका बीज गुणन केंद्राच्या वहिवाटीखाली येथे १२.१९ हेक्टर आर क्षेत्र असून कृषी चिकित्सालय व फळरोपवाटिका येथे वहिवाटीखाली ४६.३५ हेक्टर आर असे एकूण ५८.५४ हेक्टर आर इतके क्षेत्र या ठिकाणी आहे. येथून काही अंतरावर आजऱ्याची सध्याची एमआयडीसी आहे. या एमआयडीसीला २५ वर्षे होऊन गेली असून पहिल्यांदा हा विस्तार होणार आहे.

वास्तविक शासन परिपत्रक १७ ऑक्टोबर २०११ नुसार शासनाने फळरोपवाटिकांचे महत्त्व व गरज विचार घेता रोपवाटिका किंवा तालुका बीज गुणन केंद्राच्या जमिनी खाजगी संस्था, इतर शासकीय विभाग, नगरपालिका किंवा इतर संस्थांना कोणत्याही कारणास्तव हस्तांतरित न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता; परंतु हा प्रस्ताव कृषिमंत्र्यांकडे गेल्यानंतर त्यांनी तरतुदींना अपवाद करण्याचा अधिकारी मुख्यमंत्र्यांना असल्याने हा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.

सद्य:स्थिती..

आजरा हे इचलकरंजीकर घोरपडे यांच्या जहागिरीमध्ये होते. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वी घाेरपडे सरकार यांनी नारायण घोरपडे यांच्या नावे या बागेची निर्मिती केली होती. १९८२ पासून ही बाग कृषी विभागाकडे आहे. या ठिकाणी विविध मातृवृक्षांची लागवड केलेली आहे. येथे जातिवंत वेंगुर्ला ४ काजू व इतर असे १५० मातृवृक्ष आहेत, तसेच सिसम, पळस, बकुळा, आवळा, हिरडा अशी झाडे आहेत.

वनस्पती पार्क

हर्षवर्धन पाटील पालकमंत्री असताना नारायण बागेत लाखो रुपये खर्च करून औषधी वनस्पती पार्कची उभारणी करण्यात आली होती. या ठिकाणी पॉलिहाऊसही उभारण्यात आले आहे. येथे शेततळेही असून येथून चित्री नदीपर्यंत ३ किलोमीटर पाइपलाइनही टाकण्यात आली आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी या ठिकाणी आग लागल्याने हे पार्क जळून गेले.

Web Title: 43 more acres of land for Ajara MIDC Kolhapur district, Agriculture Department orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.