आरक्षणांत अडकली शिपायांची ४३ पदे
By admin | Published: February 12, 2015 12:04 AM2015-02-12T00:04:46+5:302015-02-12T00:24:22+5:30
जिल्हा परिषद : परीक्षेचा निकाल ठेवला राखून
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमधील भरती प्रक्रियेतील शिपाई पदाच्या ४३ जागांचा निकाल मराठा व मुस्लिम आरक्षणाच्या स्थगितीमुळे राखून ठेवला आहे. मंगळवारीच राज्य मंत्रिमंडळाने स्थगितीपूर्वी जातवैधता प्रमाणपत्र मिळालेल्या उमेदवारांची मराठा आरक्षणानुसार सरकारी व निमसरकारी सेवेतील निवड कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु याबाबत लेखी मार्गदर्शन न आल्याने ते आल्यानंतरच याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या १८३ जागांसाठी परीक्षा झाली. यामधील शिपाई पदाच्या ४३ जागांच्या परीक्षेचा निकाल हा मराठा व मुस्लिम आरक्षणाच्या स्थगितीमुळे राखून ठेवण्यात आला; परंतु कालच मंत्रिमंडळाचा निर्णय याबाबत होऊन वृत्तपत्रांतून प्रसिद्धीही झाली आहे; परंतु या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी स्वरूपात कोणताही शासकीय आदेश आलेला नाही. त्यामुळे या संदर्भातील निर्णय शासकीय मार्गदर्शन आल्यानंतरच होणार आहे.
इतर पदांच्या परीक्षांचे निकाल होऊन त्याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने संबंधितांना पोस्टाने पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत पर्यवेक्षिका व विस्तार अधिकारी (पंचायत) या पदांचे आदेश पाठविण्यात आले आहेत. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व कनिष्ठ आरेखक या पदांच्या निकालाबाबतची टिप्पणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. त्यांच्या सहीने याबाबतचे आदेश काढले जाणार आहेत.
उर्वरित इतर ग्रामसेवक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, आदी पदांची आदेश काढण्यासंदर्भातील प्रक्रियाही सुरू असून, येत्या आठ दिवसांत ती पूर्ण होईल, असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)