सराफी दुकानावर ४.५ कोटींचा दरोडा
By Admin | Published: March 29, 2015 12:43 AM2015-03-29T00:43:41+5:302015-03-29T00:45:08+5:30
इचलकरंजीतील घटना : पालनकर ज्वेलर्सची लूट; बंदुकीच्या धाकाने रखवालदारास बांधून घातले
इचलकरंजी : येथील कागवाडे मळ्यातील के.व्ही.पालनकर या सराफी दुकानावर बंदुकीसह शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दरोडेखोरांनी १४ किलो सोने, २८५ किलो चांदी व दोन लाख रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे शहरातील सराफ व्यवसायिकांसह पोलीस दलात जोरदार खळबळ उडाली.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कागवाडे मळ्यातील कमलाकर विठ्ठल पालनकर यांचे के.व्ही.पालनकर ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. कमलाकर व त्यांचा मुलगा संदीप हे दुकान सांभाळतात. दुकानाच्या वरील मजल्यावर ते राहतात. रखवालीसाठी म्हणून परिसरातील दोन दुकानदारांच्यात मिळून उदयसिंग खडकसिंग याला सुरक्षा रक्षक म्हणून नेमला आहे. नेहमीप्रमाणे तो दुकानाच्या कट्ट्यावर झोपला होता. शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चौघे दरोडेखोर तेथे आले. त्यांनी बंदूक आणि अन्य शस्त्रांचा धाक दाखवून खडकसिंगला शेजारी असलेल्या सुभाष श्रीरंग पोतदार ज्वेलर्सच्या दारात नेले. त्याचे हात-पाय बांधून त्याला आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. एकजण तेथेच थांबला. अन्य तिघांनी पालनकर यांच्या दुकानाच्या मुख्य दरवाजालगत असलेल्या छोट्या दरवाजाचे कुलूप तोडले. आत प्रवेश करून आतील पहिल्या खोलीचा दरवाजा तोडून त्या खोलीतील लोखंडी तिजोरी फोडून त्यातील २८५ किलो चांदीचे दागिने, भांडी चोरली. त्यानंतर सोन्याचा विभाग असलेल्या खोलीचा दरवाजा तोडला. त्या खोलीतील लोखंडी तिजोरी बनावट चावीने उघडली. त्यातील सोन्याचे हार, बांगड्या, हिरेजडीत अन्य दागिने, अंगठ्या, चेन, गंठण अशा सर्व प्रकारचे चौदा किलो शंभर ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले.
दरम्यान, बांधलेला रखवालदार खडकसिंग व त्याच्यासोबत थांबलेला व्यक्ती पाहून समोरील बांधकामावर रखवाली करणारा कामगार देवाप्पा तेथे आला. त्यालाही शस्त्राचा धाक दाखवून खडकसिंगशेजारी बसवून ठेवले. दोघांच्याही तोंडावर शाल पांघरूण ठेवण्यात आली होती. चोरी करून दरोडेखोर चांदणी चौकाच्या दिशेने निघून गेले. याची चाहूल लागल्याने रखवालदारासोबत झोपवून ठेवलेल्या देवाप्पा याने खडकसिंगला सोडवले. त्यानंतर खडकसिंगने दुकानाच्या दिशेने धाव घेतली. दुकानात चोरी झाल्याचे पाहून मालक पालनकर यांना खाली बोलावले. यावेळी पहाटेचे चार वाजले होते. त्यांनी तत्काळ गावभाग पोलीस ठाण्यात फोन केला. पोलिसांनी येतो, असे सांगितले मात्र पोलिसांना यायला वेळ होवू लागल्याने पालनकर यांनी स्वत: जाऊन पोलिसांना बोलावून आणले. पोलिसांनी प्राथमिक तपासणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत सकाळचे पावणेसात वाजले होते.
सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास श्वानपथक घटनास्थळी आले. श्वानाने दुकानापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील चांदणी चौकापर्यंत माग काढला . त्यामुळे चोरटे कर्नाटकच्या दिशेने गेले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा वाद
इचलकरंजीतील प्रथमच एवढा मोठा दरोडा पडला असला तरी सकाळी पोलीस अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर हद्दीवरून वाद घालत होते. पोलीस ठाण्याचा नकाशा घेऊन हा हद्दीचा वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू होता. शेवटी पायरीपासून रस्ता गावभागच्या हद्दीत, तर दुकान शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याची चर्चा सुरू होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर दुकानापासून गावभाग पोलीस ठाणे जवळ असल्याने तपास त्यांच्याकडेच वर्ग केला.
तपास यंत्रणा राबविण्यासाठी विलंब
पहाटे चार वाजता पोलिसांना कळविले असले तरी पोलीस अर्धा तास उशिरा, तर ठाण्याचे अधिकारी सात वाजता घटनास्थळी आले. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अकरा वाजता, सहायक पोलीस अधीक्षक साडेअकरा वाजता, त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख बारा वाजता व विशेष पोलीस महानिरीक्षक पाऊण वाजता घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर तपासाची दिशा ठरवून तपास यंत्रणा राबविण्यास सुरूवात झाली. तोपर्यंत दरोडेखोर दूरवर निघून गेले असतील, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची टाळाटाळ
घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली असली तरी तपासाबाबत सांगण्यासारखे काहीच नसल्याचे सांगत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना भेटण्याचे टाळले. त्याचबरोबर घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर पत्रकार व छायाचित्रकार यांना तेथे मज्जाव करण्यात आला.
अत्याधुनिक पद्धतीनेही तपास सुरू
घटना मोठी असल्याने पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही व कॉल डिटेल्स काढून अत्याधुनिक पद्धतीनेही तपास यंत्रणा राबविण्यास सुरूवाता केली आहे. घटनास्थळी स्थानिक व जिल्हा दोन्ही एलसीबी पथकाने भेटी देऊन आपापल्या पद्धतीने तपास यंत्रणा गतीमान केली आहे. (प्रतिनिधी)