४५ लाखांचे कापड पळविले

By admin | Published: April 25, 2015 12:36 AM2015-04-25T00:36:15+5:302015-04-25T00:44:24+5:30

ट्रकही गायब : इचलकरंजीतील कापड उत्पादकांमध्ये घबराट

45 lakhs of clothes were scattered | ४५ लाखांचे कापड पळविले

४५ लाखांचे कापड पळविले

Next

इचलकरंजी : ४५ लाख रुपयांच्या कापडाच्या गाठींसह ट्रक पळवून नेल्यामुळे शहरातील वाहतूकदार संस्था व ट्रक मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील पिंडवाडा येथे ही घटना घडली असून, त्यामुळे अडत व्यापारी व कापड उत्पादकही धास्तावले आहेत.
येथील राजेंद्र मगदूम (रा. मधुबन सोसायटी) यांचा ट्रक (एमएच ०९ सीयू ३८३९) हा सोमवारी शशी ट्रान्स्पोर्टमधून ४५ लाख रुपये किमतीच्या २१३ गाठी कापड घेऊन राजस्थानला निघाला. तो दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गुजरात सीमा ओलांडून राजस्थानमध्ये पिंडवाडा येथे घाटात जात असताना बोलेरो जीप गाडीतून आलेल्या पाच-सहाजणांनी ट्रक अडविला. ते जबरदस्तीने ट्रकमध्ये घुसले. त्यांनी चाकू व बंदुकीचा धाक दाखविला आणि ट्रकचालक शीतल कदम व क्लिनर विकास शिंदे या दोघांना त्या ठिकाणापासून सुमारे ३०० कि.मी. अंतरावर रनसे (सोजेत) येथे एका शेतात सोडले. चोरटे ट्रक घेऊन पळून गेले. मात्र, त्यांना कदम व शिंदे यांच्या अंगावरील बनियन व चड्डी व्यतिरिक्त सर्व कपडे काढून घेतले होते. या दोघांना पहाटे ३.३० वाजता सोडल्याची माहिती ट्रकचे मालक राजेंद्र मगदूम यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. या घटनेची नोंद पिंडवाडा (राजस्थान) पोलीस ठाण्यात झाली आहे.
इचलकरंजीतून निघालेले ट्रक तिसऱ्या दिवशी राजस्थानला पोहोचतात. उन्हाळ्याच्या दिवसात रात्री प्रवास करावा लागतो. मात्र, ट्रकमधील कापडाचा विमा उतरविण्यास अडत व्यापारी टाळाटाळ करीत असतात. परिणामी, लाखो रुपयांच्या कापडाची जोखीम वाहतूकदार संस्था घेत नाहीत. कारण वाहतूकदार फक्त वाहतूक भाडे घेतात. यामुळे संबंधित अडत व्यापारी व कापड उत्पादक अडचणीत येतात. मागील महिन्यातही पिंपवाडा येथील घाटातच इचलकरंजीतील आणखीन एक ट्रक चोरण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा ट्रकचालकाने दाद दिली नाही. त्यामुळे त्याला चोरट्यांनी मारहाण केली व त्यात चालक गंभीर जखमी झाला होता. अशा घटनांमुळे येथील वस्त्रोद्योगात अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 45 lakhs of clothes were scattered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.