आजऱ्यात साडेचार लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त, पुण्याच्या एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 01:54 PM2023-07-18T13:54:59+5:302023-07-18T14:07:55+5:30
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
सदाशिव मोरे
आजरा : आजरा आंबोली रस्त्यावर व्हिक्टोरिया पुलाजवळ ४ लाख ४८ हजार ५२० रुपयांचा गोवा बनावाटीचा मद्य साठा जप्त करण्यात आला आहे. तर कारसह शिवाजी अनंता धायगुडे (वय ५५ रा. फातिमानगर पुणे) याला अटक केली. ही कारवाई राज उत्पादन शुल्कच्या गडहिंग्लज विभागाने सोमवारी (दि. १७) केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या आदेशानुसार गोवा बनावट मद्याची विक्री व वाहतूक कोल्हापूर जिल्ह्यात होऊ नये यासाठी कारवाईची सक्त आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने गडहिंग्लज विभागाचे पथक आजरा आंबोली रस्त्यावर गस्त घालत होते. आजऱ्याजवळील व्हिक्टोरिया पुलाजवळ एक संशयित कार क्रमांक (एमएच -१२- डी.वाय.४५९३) आढळली.
चालकाकडे चौकशी केली असता कारमध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे ३५ बॉक्स आढळून आले. गाडीसह मद्याचे ३५ बॉक्स जप्त करून चालक शिवाजी धायगुडे याला अटक केली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाचे निरीक्षक सचिन भवड, दुय्यम निरीक्षक किरण पाटील, लक्ष्मण पाटील, पोलीस भरत सावंत, संदीप जानकर, संदीप चौगुले यांनी केली आहे. अधिक तपास दुय्यम निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.