जिल्ह्यातील ४५ टक्के विद्यार्थ्यांचा ‘स्वाध्याय’वर अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:13 AM2021-03-30T04:13:19+5:302021-03-30T04:13:19+5:30
कोल्हापूर : राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यासाठी स्वाध्याय (स्टुंडटस व्हॉटस्ॲप बेसड डिजिटल होम ...
कोल्हापूर : राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्यासाठी स्वाध्याय (स्टुंडटस व्हॉटस्ॲप बेसड डिजिटल होम असेसमेंट) उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची सुरुवात गेल्या वर्षी कोरोनाच्या कालावधीत झाली. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ टक्के विद्यार्थ्यांचा ‘स्वाध्याय’वर अभ्यास सुरू आहे.
गेल्या वर्षी दि. १४ नोव्हेंबर रोजी सुरू झालेला ‘स्वाध्याय’ हा उपक्रम मराठी, गणित, विज्ञान विषयाच्या आणि मराठी, सेमी इंग्रजी, उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना दर शनिवारी व्हॉटस्ॲपद्वारे स्वाध्याय उपलब्ध होतो. तो पूर्ण करण्यासाठी त्यांना एक आठवड्याचा कालावधी दिला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीची एकूण विद्यार्थी संख्या ५,७९,४५१ आहे. त्यापैकी आतापर्यंत २,४६,२३६ जणांनी स्वाध्यायसाठी नोंदणी केली आहे. त्यातील २,३५,७३९ जण स्वाध्याय सोडवत आहेत. या उपक्रमात राज्यामध्ये कोल्हापूर हे विद्यार्थी संख्येमध्ये चौथ्या आणि पटसंख्येच्या टक्केवारीमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. या उपक्रमामुळे अभ्यासाचा सराव, उजळणीला मदत होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.
पॉईंटर्स
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी : ५,७९,४५१
स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी : २,४६,२३६
स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी : २,३५,७३९
प्रतिक्रिया
स्वाध्याय उपक्रम सुरू झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा राज्यात १९ व्या क्रमांकावर होता. आता विद्यार्थी संख्येनुसार चौथ्या, तर पटसंख्येनुसार नवव्या क्रमांकावर आहे. टॉप-थ्रीमध्ये पोहोचण्यासाठी आमचे सातत्याने काम सुरू आहे.
- संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
स्वाध्याय हा विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी उपयुक्त ठरणारा उपक्रम आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची शिक्षकांनी नोंदणी करावी.
- किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय संपादवणूक सर्वेक्षणाच्या तयारीसाठी ‘स्वाध्याय’ महत्त्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची या उपक्रमात नोंदणी करण्यासह त्यांच्याकडून स्वाध्याय सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-डॉ. आय. सी. शेख, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था.
विद्यार्थी म्हणतात
स्वाध्याय सोडविल्याने शिकविलेले धडा, कवितांबाबतची अधिक माहिती मिळते. त्याची अभ्यासासाठी चांगली मदत होते.
-शिवम बोबडे, दहावी, अयोध्या पार्क
गेल्या आठवड्यात मी पहिल्यांदा स्वाध्याय सोडविला. खूप छान वाटले. त्यामुळे अभ्यासाची उजळणी, सराव होतो.
-प्रगती हंजे, नववी, शाहूपुरी
चौकट
उर्दूचे ४,५०२ विद्यार्थी
जिल्ह्यात या उपक्रमातील मराठी माध्यमातील विद्यार्थी संख्या २,४२,२६७ आहे. त्यात उर्दू माध्यमाचे ४,५०२ विद्यार्थी आहेत.
===Photopath===
290321\29kol_9_29032021_5.jpg
===Caption===
फोटो (२९०३२०२१-कोल-स्वाध्याय डमी)