कोल्हापुरातील ४५ हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली; 'या' तालुक्यांना अधिक फटका

By राजाराम लोंढे | Published: July 29, 2023 11:51 AM2023-07-29T11:51:16+5:302023-07-29T11:51:43+5:30

शेतकरी हवालदिल

45 thousand hectares of sugarcane in Kolhapur under flood water | कोल्हापुरातील ४५ हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली; 'या' तालुक्यांना अधिक फटका

कोल्हापुरातील ४५ हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली; 'या' तालुक्यांना अधिक फटका

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : जिल्ह्यात गेली आठ-दहा दिवस एकसारखा पाऊस कोसळत असल्याने सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले आहे. नदीकाठावरील ऊस, भातपिके पाण्याखाली गेली असून सर्वाधिक फटका ऊस शेतीला बसणार आहे. तब्बल ४५ हजार हेक्टरवरील ऊस पीक गेली आठ-दहा दिवस पाण्याखाली असल्याने उसाच्या शेंड्यात पाणी व माती गेल्याने कुजण्याची प्रक्रिया वेगाने होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात १८ जुलैपासून पावसाने जोर धरला आहे. गेली दहा दिवस एकसारखा पाऊस सुरू आहे. पंचगंगेसह इतर नद्यांवरील ७२ हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सर्वच नद्यांचे पाणी परिसरातील शेतीत घुसले आहे. ऊस, भातपिके पाण्याखाली गेली आहेत. गेले आठ दिवस उसाचे पीक पाण्याखाली बुडाल्याने नुकसान होणार आहे. याचा सर्वाधिक फटका शिरोळ, हातकणंगले व करवीर तालुक्यांना अधिक बसणार आहे.

पूर्ण बुडालेल्या उसाला असा फटका बसतो

  • उसाच्या शेंड्यात गाळमिश्रित ओल्या चिखलाचा थर बसल्याने कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते.
  • ऊस शेंड्याकडून खाली वाळत जातो.
  • पाण्यात बुडालेल्या कांड्याना मुळ्या फुटतात.
  • उसाला पांगशा फुटू लागतात.
  • पांगशा फुटलेला ऊस पोकळ होतो.
  • पुराच्या पाण्यात आठ दिवसांपेक्षा अधिक ऊस राहिल्यास ८० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
     

पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांनी हे करावे.

  • शिवारात साठलेले पाणी चराद्वारे बाहेर काढा.
  • उसाला पांगशा फुटल्यानंतर ऊसतोड होईपर्यंत त्या काढाव्यात.
  • ऊस कुजून वाळला तर ऊस जमिनीलगत कोयत्याने तोडून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरावा.
  • पूरबुडीत उसावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असतो.

 

उसाचे शेंडे आठ-दहा दिवस पाण्याखाली राहिले तर कुजून वाळण्याची प्रक्रिया वेगाने होते. सर्वच नद्यांची पातळी गेले आठ दिवस स्थिर राहिल्याने धोका अधिक आहे. - डॉ. अशोक पिसाळ, सहयोगी संशोधन संचालक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, कोल्हापूर

Web Title: 45 thousand hectares of sugarcane in Kolhapur under flood water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.