Kolhapur: खडकाळ माळरानात १५ गुंठ्यांत ४५ टन उसाचे उत्पादन, लाटवडे येथील युवा शेतकऱ्याची किमया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 05:42 PM2023-12-26T17:42:14+5:302023-12-26T17:42:30+5:30
आयुब मुल्ला खोची: पाणी अन् मशागतीचं व्यवस्थापन वेळच्या वेळी करीत खडकाळ माळरानात १५ गुंठ्यांत ४५ टन उसाचे उत्पादन काढण्याची ...
आयुब मुल्ला
खोची: पाणी अन् मशागतीचं व्यवस्थापन वेळच्या वेळी करीत खडकाळ माळरानात १५ गुंठ्यांत ४५ टन उसाचे उत्पादन काढण्याची किमया हातकणंगले तालुक्यातील लाटवडे येथील युवा शेतकरी शरद विष्णू पाटील यांनी केली आहे. इलेक्ट्रॉनिक साहित्याची विक्री दुरुस्ती करणारा मिस्त्री शेतीचा पोत सुधारून ऊस शेतीला सुध्दा फायद्यात आणण्यात यशस्वी ठरला आहे.
शरद पाटील इलेक्ट्रॉनिक्स विषयातून आयटीआय शिक्षण उत्तीर्ण झालेला आहे. टिव्ही दुरुस्त करण्यात त्याचा हातखंडा आहे. हा व्यवसाय करीत त्याने शेतीत उसाचे उत्पन्न अधिकचे घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. खडकाळ जमिनीत विक्रमी उत्पन्न काढण्याचा त्याने चंग बांधला. १५ गुंठयाची जमीन तयार केली. उभी नांगरट केल्यानंतर चार ट्रॉली शेणखत टाकले. त्यांनतर आडवी नांगरट केली. ८६०३२ उसाची दोन डोळे पद्धतीने गेल्या वर्षीच्या जून मध्ये लागण केली. खरीप हंगाम असल्याने त्यामध्ये आंतरपीक म्हणून भुईमूग टोकणला. ड्रिप बरोबरच पाट पाण्याची सोय केली. दोन्ही पिके दमदार आली. सहा क्विंटल शेंगा झाल्या.
पानांची रुंदी उसाच्या पेऱ्याची जाडी वाढण्यासाठी दोन वेळा फवारणी व आळवणी केली. रोगाचा प्रादुर्भाव होवू नये याची काळजी घेतली. दहा फूट अंतरात सुमारे ५५ ते ६० उसाची संख्या होती. ४५ कांडीचा लांबलचक भरभक्कम तयार झाला. तोडताना त्याचे तीन ते चार कंडके करूनच मोळी बांधावी लागली. ऊस वारणा व शरद कारखान्याला गळीतासाठी पाठविला. त्याचे वजन ४५ टन २४५ किलो झाले. चाळीस हजार रुपयांचा एकूण खर्च वजा जाता १ लाख ४ हजार रुपये व शेंगाचे असे सव्वा लाखाचे उत्पन्न यातून मिळाले. यासाठी सचिन पाटील (भादोले),नितीन देशमुख(कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभले.