Kolhapur: पाणी निर्गतीसाठी ४५७ कोटी निधी द्यावा, जागतिक बँक पथकासमोर आराखडा सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 01:05 PM2024-06-26T13:05:07+5:302024-06-26T13:06:17+5:30
पूरसंरक्षण भिंतीसह ३६८ किलोमीटर गटर्सचे नियोजन
कोल्हापूर : शहरातील पाऊस पाण्याचे निर्गतीकरण गतीने होण्यासाठी शहरात नव्याने ३६८ किलोमीटरचे गटर्स तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेस ४५७ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. यातून गटर्ससह पूरसंरक्षण भिंतही बांधण्यात येईल, अशी माहिती प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी जागतिक बँकेच्या पथकास सांगितली. महापालिकेत बैठक झाली. बैठकीत पथकासमोर पाऊस, पूर पाण्याच्या निर्गतीकरणासाठीचा आराखडा सादर केला. यावेळी पथकातील सदस्यांनी तातडीने करावयाच्या आणि दीर्घकालीन करावयाच्या कामांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या.
शासनाच्या मित्रा संस्थेतर्फे महापूर नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. उपाययोजनांसाठी जागतिक बँक कर्ज देणार आहे. यासाठी जागतिक बँकेचे जोलांटा, अनुप, शीना, टीजर्क यांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी शहरातील पूरबाधित परिसराची पाहणी केल्यानंतर महापालिकेत बैठक घेतली. बैठकीत महापूर आल्यानंतर कोणत्या सेवा विस्कळीत होतात, याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, शहर उपरचनाकार रमेश मस्कर यांनी दिली.
यावेळी मित्राचे अधिकारी अनुप यांनी महापूर धोका नियंत्रण आराखडा तयार केला आहे? याची विचारणा केली. मात्र, त्यांनी जसा आरखडा अपेक्षित होता, तसा महापालिकेने तयार केला नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यामुळे अनुप यांनी पुढील ५० वर्षे गृहीत धरून महापूर धोका नियंत्रण आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासक मंजुलक्ष्मी म्हणाल्या, पाऊस, पूर, महापुराचे पाणी तातडीने निर्गत होण्यासाठी शहरात गटर्स बांधणीचे काम सुरू आहे. यासाठी निधीची गरज आहे. पायाभूत विकासासाठी निधी लागणार आहे.
मस्कर म्हणाले, ब्लू, रेड लाईन तयार आहे. यानुसार शहरात बांधकामांना परवानगी दिली जाते. बैठकीस अतिरिक्त आयुक्त राहुल रोखडे, आदी उपस्थित होते.
रियल टाईम माहितीसाठी स्वतंत्र कक्ष
पूर, महापूर, आपत्तीची माहिती रियल टाईम मिळण्यासाठी शहर, जिल्ह्यासाठीचे स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक सुविधा असतील, अशीही माहिती मंजुलक्ष्मी यांनी दिली.
भेट देऊन घेतली माहिती
ताराराणी चौकातील फायर स्टेशन, सुतार वाडा, रिलायन्स मॉलच्या पाठीमागील परिसर, जयंती नाला बंधारा, विन्स हॉस्पिटल, आदी आदी पूरबाधित परिसरास पथकाने भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली.