‘मेडिकल’ला प्रवेश देतो असे सांगून ४६ लाखांची फसवणूक
By admin | Published: September 20, 2015 09:49 PM2015-09-20T21:49:56+5:302015-09-21T00:07:45+5:30
कुंडल येथील युवकास कोल्हापुरात अटक
कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नवी मुंबई येथे अॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून ४६ लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या युवकास रविवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी स्नेहल संभाजी पवार (वय ३५, रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.
संशयित स्नेहल पवार याने शिवकुमार जगतनारायणजी खन्ना (रा. हिरणमगरी सेक्टर, उदयपूर-राजस्थान) यांच्याकडून त्यांची मुलगी प्रियल हिला डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नवी मुंबई येथे अॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून ४६ लाख रुपये घेऊन तो गायब झाला होता. या प्रकरणी शिवकुमार यांनी सूरजपोल पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली होती.
पवार हा सांगली जिल्ह्यात राहणारा असल्याने सूरजपोल पोलिसांनी त्याच्या कुंडल येथील घरी छापा टाकला असता तो कोल्हापूर येथील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात राहत असल्याचे समजले. त्यानुसार सूरजपोल पोलिसांनी रविवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
अनिल देशमुख यांची भेट घेऊन तपासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
त्यानुसार देशमुख यांनी गुन्हे शाखेच्या टीमला त्यांच्यासोबत पाठवून आरोपी पवार याला बिनखांबी गणेश मंदिराजवळील चायनिस हॉटेलजवळ ताब्यात घेतले. पवार याने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे सूरजपोल पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)