‘गव्हर्न्मेंट सर्व्हंटस्’साठी ४६ टक्के मतदान
By admin | Published: March 23, 2015 12:18 AM2015-03-23T00:18:41+5:302015-03-23T00:36:06+5:30
आज मतमोजणी : तीनपर्यंत निकाल अपेक्षित
कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् को-आॅप. बॅँकेसाठी शांततेत ४६.९० टक्के मतदान झाले. अटीतटीच्या तिरंगी लढतीत गतवेळेपेक्षा २ टक्के मतदान वाढले आहे. एका-एका मतासाठी उमेदवारांसह समर्थकांनी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याने मतदानात चुरस पाहावयास मिळाली. १५ जागांसाठी तिरंगी लढतीत ४९ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतपेटीत बंद झाले. आज, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे. साधारणत: दुपारी साडेतीनपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
राज्य कार्यक्षेत्र असलेल्या गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँकेची निवडणूक काटालढत झाली. बॅँकेचे विद्यमान संचालक रवींद्र पंदारे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेल, बाळासाहेब घुणकीकर यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी पॅनेल व विश्वासराव माने यांच्या नेतृत्वाखालील आदर्श पॅनेल यांच्यात लढत झाली. कर्जावरील व्याजदर, जादा खर्च आदी मुद्द्यांवर विरोधक व सत्तारुढ गटात सामना झाला. रविवारी सकाळी आठपासून पेटाळा येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व न्यू हायस्कूल येथे मतदानास प्रारंभ झाला.
बॅँकेचे २० हजार ३४६ मतदार असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ४१ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी उसळली होती. मतदान जास्त असल्याने एका केंद्रात तीन बूथवर मतदानाची व्यवस्था केल्याने लवकर मतदान होण्यास मदत झाली. परिणामी मतदान केंद्रांवर रांगा दिसत नव्हत्या. दुपारी बारापर्यंत १९ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी पाच पर्यंत ९५४२ मतदान झाले.
कोल्हापूरसह सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना आणण्यासाठी तिन्ही पॅनेलप्रमुखांनी खास व्यवस्था केली होती. हे मतदार एकत्रित येऊन मतदान करत होते. तिन्ही पॅनेलच्या बूथवर मतदारांसह त्यांच्या समर्थकांची गर्दी दिवसभर दिसत होती. अटीतटीची लढत असल्याने मतदारांना विनवणी करण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ दिसली. उमेदवारांसह त्यांचे समर्थक निवडणूक चिन्हाचे स्कार्प व टोप्या परिधान करून प्रत्येक मतदाराला भेटण्यासाठी प्रयत्न करत होते. (प्रतिनिधी)
मतदान केंद्राशेजारीच परीक्षा
पद्माराजे व न्यू हायस्कूलमध्ये मतदान होते. या कॅम्प्समध्ये चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा सुरू होती. मतदारांचा गोंगाटातच विद्यार्थांना परीक्षा द्यावी लागल्याने पालकवर्गातून परीक्षेव्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली.
मतदानाची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली आहे. सोमवारी सकाळी आठपासून मतमोजणीस सुरुवात करणार असून, ४० टेबलांवर मतमोजणी करण्यात येणार असल्याने साधारणत: दुपारी साडेतीनपर्यंत निकाल अपेक्षित आहे.
- प्रदीप मालगावे
(निवडणूक निर्णय अधिकारी)
वाहतुकीची कोंडी!
पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये मतदान असल्याने पॅनेलचे दोन-तीन बूथ या मार्गावर लावले होते. बूथवर मतदारांसह त्यांच्या समर्थकांची गर्दी झाल्याने सकाळपासून नंगीवाली तालीम ते बिनखांबी गणेश मंदिर मार्गावर वाहतुकीची कोेंडी झाली होती. त्यातूनच वाहतूक सुरू असल्याने कसरत करतच रस्ता शोधावा लागल्याने वाहनधारक संतापले होते.
राज्यातील पहिलीच मोठी निवडणूक
प्राधिकरणाने निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून २० हजार सभासद असलेली ही पहिलीच निवडणूक होती. राज्य कार्यक्षेत्र असलेल्या या बॅँकेची निवडणूक प्रक्रिया प्रदीप मालगावे यांनी तितक्याच जबाबदारीने पार पाडली.