‘गोकुळ’च्या उलाढालीत गतवर्षात ४६५ कोटींनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 05:59 PM2022-08-18T17:59:40+5:302022-08-18T18:00:00+5:30
दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या परताव्यातही वाढ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची गेल्या वर्षभरात उलाढालीत ४६५ कोटींनी वाढ झाली आहे. नफ्यातही ८५ लाखांची वाढ झाली असून २९ सप्टेंबरला संघाची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे.
‘गोकुळ’ दुधाची चव व गुणवत्तेमुळे मुंबईसह पुण्यात दुधाला खूप मागणी आहे. दिवसेंदिवस मागणी वाढत असतानाच म्हैस दूध कमी पडू लागल्याने संघाने २० लाख लिटरचा संकल्प करत त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. परराज्यातील म्हैस खरेदीसाठी २५ हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. त्यामुळेच गेल्या वर्षभरात दैनंदिन दूध संकलनात तब्बल दीड लाख लिटरची वाढ झाली आहे. त्याचबरोबर विक्रीतही वाढ झाल्याने एकूणच संघाची उलाढाल वाढली आहे. संघाने ३१०६ कोटी उलाढालींचा टप्पा पार केला आहे. मार्च २०२१ च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये ४६५ कोटींची वाढ झाली आहे. दरम्यान, संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता महासैनिक दरबार हॉल येथे होणार आहे.
उत्पादकांच्या पदरात ३७१ कोटी जादा
संघाची उलाढाल वाढली असतानाच दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या परताव्यातही वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात २४७४ कोटींचा परतावा शेतकऱ्यांना दिला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३७१ कोटी जादा रक्कम आहे.
पशुखाद्य कारखान्याचे विस्तारीकरण होणार
वार्षिक सर्वसाधारण सभेत गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील पशुखाद्य कारखान्याचे विस्तारीकरणाचा विषय मंजुरीसाठी ठेवला आहे. पशुखाद्याची मागणी वाढत असताना त्यापटीत उत्पादन करण्याचा हेतू संघाचा आहे.
गाय दूध विक्री दरात वाढ
गोकुळने गाय दूध विक्री दरात प्रतिलीटर दोन रुपये आज, गुरुवार पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. टोण्ड व गाय दूध प्रतिलीटर ४६ रुपये तर प्रमाणित दूध ५२ रुपये लीटर होणार आहे.
दूध उत्पादनात झालेली घट व बाजारपेठेतील मागणी पाहून ‘गोकुळ’ने पंधरा दिवसांपूर्वी म्हैस दूध खरेदी व विक्री दरात प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ केली होती. गाय दूध खरेदी दरात प्रतिलीटर रुपयाची वाढ केली होती, मात्र विक्री दरात वाढ केली नव्हती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ‘अमूल’ ने विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. श्रावण महिना, उपवास, सणामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यात ‘गोकुळ’ ने गाय दूध खरेदी दरात वाढ करूनही विक्री वाढवली नव्हती. त्यामुळे विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.
अशी झाली गाय दूध दरात वाढ, प्रतिलीटर -
दूध पूर्वीचा दर नवीन दर
टोण्ड -४४ रुपये - ४६ रुपये
गाय दूध -४४ रुपये -४६ रुपये
प्रमाणित -५० रुपये -५२ रुपये