हुपरीतील कारागीराकडून कोल्हापूरच्या दोघा सराफांना ४७ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 10:45 AM2020-10-20T10:45:50+5:302020-10-20T10:47:01+5:30
crimenews, kolhapur, police सोन्या-चांदीचे दागिने तयार करून देतो, असे सांगून कोल्हापुरातील दोघा सराफांना सुमारे ४७ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संशयित कारागीर श्रीकांत ऊर्फ अमित तवनाप्पा कांते (रा. पाटील गल्ली, हुपरी, ता. हातकणंगले) याच्यावर गुन्हा नोंद झाला. सराफ व्यावसायिक जितेंद्र शामराव गरडे व प्रशांत जाधव (दोघेही रा. शिवाजी पेठ) यांनी तक्रार दिली.
कोल्हापूर : सोन्या-चांदीचे दागिने तयार करून देतो, असे सांगून कोल्हापुरातील दोघा सराफांना सुमारे ४७ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संशयित कारागीर श्रीकांत ऊर्फ अमित तवनाप्पा कांते (रा. पाटील गल्ली, हुपरी, ता. हातकणंगले) याच्यावर गुन्हा नोंद झाला. सराफ व्यावसायिक जितेंद्र शामराव गरडे व प्रशांत जाधव (दोघेही रा. शिवाजी पेठ) यांनी तक्रार दिली.
गरडे व जाधव या सराफांचे गुजरी कासार गल्लीत इंद्रशांती प्लाझा आणि सावित्री प्लाझा येथे सराफ दुकाने आहेत. दोघेही सराफ व्यावसायिक संशयित आरोपी अमित कांते याला सोने व चांदी देऊन त्याच्याकडून दागिने तयार करून घेत होते. त्यातून गेले काही वर्षे त्यांचे व्यवहार सुरू होते. संशयित कांते याचा हुपरीमध्ये दागिने तयार करण्याचा करखाना होता. त्याच्या हाताखाली कामगार होते.
सराफांनी सोने-चांदी दिल्यानंतर त्याचे टप्प्या-टप्प्याने दागिने तयार करून तो या सराफांना परत देत होता; पण २०१६ पासून त्याच्याकडे सोने-चांदी बाकी वाढत गेली. सराफांनी त्याच्याकडे उर्वरित सोन्याचे दागिने परत करण्यासाठी तगादा लावला; पण त्याने ते देण्याचे वारंवार आश्वासन दिले.
गेली महिनाभर संशयिताचा मोबाईल बंद होता तसेच तो हुपरी येथेही राहत नसल्याचे समजल्याने सराफांना घाम फुटला. दोघा सराफांनी सुमारे ४७ लाख २० हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कांते विरोधात तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश पाटील करत आहेत.
फसवणुकीची व्याप्ती वाढणार
कोल्हापुरातील अनेक सराफांना तो दागिने बनवून देत होता, त्यामुळे संशयित कांते याने अनेकांना गंडा घातल्याचे समजते. या फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी व्यक्त केली. संशयिताने कोल्हापूरसह सांगली तसेच बेळगाव येथीलही सराफांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा सराफ बाजारात आहे.