कोल्हापूर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ४८ कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:19 AM2018-10-29T00:19:20+5:302018-10-29T00:19:47+5:30
कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेचा राज्यभर बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असले तरी कोल्हापुरात थोडी बरी परिस्थिती आहे. मुळातच मध्यम, ...
कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेचा राज्यभर बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असले तरी कोल्हापुरात थोडी बरी परिस्थिती आहे. मुळातच मध्यम, मोठ्या धरणांमुळे पाणीदार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १०७ गावांतून ४८ कोटी ७८ लाखांची १८५९ कामे पूर्णत्वास गेली आहेत. यात शासकीय व लोकसहभागातून गाळ काढणे, शेततळे, समतल चर, आदी कामे प्राधान्याने झाल्याने सुमारे १५ हजार टी. सी. एम. (थाऊजंड क्युबिक मीटर) पाणीसाठा नव्याने झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात काळम्मावाडी, राधानगरी, वारणा, तुळशी या मोठ्या प्रकल्पांसह आणखी १४ मध्यम प्रकल्पांतून पाण्याची साठवणूक होते. मुळातच जिल्हा जलयुक्त असल्याने येथे जलयुक्त शिवार योजनेची फारशी गरज नव्हती; पण जिल्ह्यातील विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे अतिपाऊस पडणाºया क्षेत्रांमध्ये जमिनी पाणथळ बनतात तर अतिशय कमी पाऊस असलेल्या ठिकाणी पिके पाण्यासाठी ओढ धरतात. मुळातच कोल्हापूर जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. परंपरागत पाणी साठविण्याची आणि ते शेतीसह अन्य कामाला वापरण्याची सोय आहे; पण काळानुरूप त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हे तलाव गाळाने भरून गेल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने पावसाळ्यात ओसंडून वाहणारे तलाव उन्हाळ्याच्या तोंडावर कोरडे पडतात.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाने राज्य शासनाच्या वतीने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्याचा सहभाग नोंदविला. २०१५ ते २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत १०७ गावांनी यात सहभाग घेतला. या गावांतील सर्वेक्षणानुसार ११८८ कामांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली. त्यासाठी ६० कोटी ८३ लाखांची रक्कमही मंजूर करण्यात आली. या मंजूर कामांपैकी १८५९ कामे आजअखेर पूर्णत्वास गेली आहेत. यावर ४८ कोटी ७८ लाखांचा खर्चही करण्यात आला आहे. या कामामुळे जिथे पाऊस कमी पडतो अशा जिल्ह्यातील तालुक्यात नव्याने पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे.
वर्ष गावे मंजूर पूर्ण खर्च पाणीसाठा कामे कामे (लाखांत) (टी.सी.एम.)
२०१५-१६ ६९ १२१२ १२१२ ३०३८.१० ७१५.४७
२०१६-१७ २० ४६१ ४६१ १७.०७.९२ ९१६९.९८
२०१७-२०१८ १८ २१५ १८६ १३२.२८ ४२८६.८२
सन २०१८-१९ साठी या योजनेकरिता ७२ गावांची निवड झाली असून तेथे १० कोटी ५६ लाख खर्चाची ६१२ कामे मंजूर करण्यात आली आहेत. पावसाळा सुरू असल्याने ही कामे सुरू होऊ शकली नव्हती. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नव्या कामांना सुरुवात होणार आहे.