कोल्हापूर जि.प.च्या शाळांतील ४८ विद्यार्थी ‘इस्रो’ भेटीला,फेब्रुवारीमध्ये दौरा : निबंध स्पर्धेतून निवड; १५ लाख रुपयांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:36 AM2018-01-12T00:36:13+5:302018-01-12T00:39:05+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ४८ विद्यार्थी फेबु्रवारीमध्ये ‘इस्रो’ भेटीला जाणार आहेत.
कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ४८ विद्यार्थी फेबु्रवारीमध्ये ‘इस्रो’ भेटीला जाणार आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेऊन आणि शिवाजी विद्यापीठामध्ये अंतिम फेरीतील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन ही निवड करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने १५ लाख रुपयांची तरतूद केली होती.
या नावीन्यपूर्ण योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्येच तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आठ दिवस आधी विषय देऊन निबंध स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी अशांची तालुकास्तरावर निवड करून, त्यांना ऐनवेळी विषय देऊन तेथेच निबंध स्पर्धा घेण्यात आली. पाचवी ते आठवीच्या प्रत्येकी तीन अशा १२ आणि १२ तालुक्यांचे अशा १४४ विद्यार्थ्यांच्या शिवाजी विद्यापीठामध्ये मुलाखती घेण्यात आल्या व त्यातून अंतिम ४८ विद्यार्थी निवडण्यात आले. यामध्ये २१ विद्यार्थी, तर २७ विद्यार्र्थिनी आहेत. या विद्यार्थ्यांसमवेत १२ अधिकारी, कर्मचारीही जाणार असून, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही भेट शक्य होणार आहे.
तीन मार्गांवर विमानप्रवास
या सर्व विद्यार्थ्यांना तीन मार्गांवर विमान प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. कोल्हापूर येथून गोव्याला बसने, गोवा ते थिरूअनंतपुरम, थिरूअनंतपुरम ते बंगलोर आणि बंगलोर ते पुणे असा तीन मार्गांवरचा प्रवास विमानाने होणार आहे. पुन्हा पुणे-कोल्हापूर प्रवास बसने होईल.