कोल्हापूरात ४८ हजार बालकांना पल्स पोलिओचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 10:53 AM2019-03-09T10:53:23+5:302019-03-09T11:06:55+5:30
केंद्र सरकारच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उद्या, रविवारी शहर हद्दीतील ४८ हजार २८२ बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केले असून, सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उद्या, रविवारी शहर हद्दीतील ४८ हजार २८२ बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केले असून, सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. या मोहिमेनंतर नियमित लसीकरणालाही महत्त्व देण्यात येईल आणि तशी यंत्रणा महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत सुरू ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
देशात जानेवारी २०११ पासून आजपर्यंत एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही. पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून प्रथमच अशा पद्धतीने यश मिळाले आहे. २७ मार्च २०१४ रोजी भारतास पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. परंतु नजीकच्या राष्ट्रात पोलिओ रुग्ण आढळून येत असल्याने जागतिक पोलिओ निर्मूलन होईपर्यंत ही मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले.
या वर्षीच्या मोहिमेच्या सत्रात रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजले जाणार आहेत. प्रत्येक वर्षी दोन डोस पाजले जात होते. यावेळी तो एकच दिला जाणार आहे. मोहिमेकरिता सात कुटुंब कल्याण केंद्रांसह, एस. टी. स्टॅँड, रेल्वे स्टेशन, वाशी नाका, फुलेवाडी नाका, शिरोली नाका, ऊस कामगारांच्या छावण्या, आदी १७३ केंद्रावर हे डोस पाजले जाणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.
पोलिओ या अपंगत्व निर्माण करून असाहाय्य बनविणाऱ्या रोगापासून नव्या पिढीची कायमपणे सुटका करण्याच्या या महत्त्वाच्या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, आरसीएच नोडल आॅफिसर डॉ. अमोलकुमार माने, पल्स पोलिओ कार्यक्रमाधिकारी डॉ. रूपाली यादव, आदी उपस्थित होते.