कोल्हापूरचे ४८ पर्यटक सिक्कीम, दार्जिलिंगमध्ये
By admin | Published: April 26, 2015 12:59 AM2015-04-26T00:59:43+5:302015-04-26T00:59:43+5:30
सर्वजण सुखरुप : जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची माहिती
कोल्हापूर : उत्तर भारतात पर्यटनासाठी गेलेले कोल्हापूरचे ४८ पर्यटक सिक्कीम, दार्जिलिंग येथे सुखरूप असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, या विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेपाळ तसेच मुंबई मंत्रालय येथे संपर्क साधून कोल्हापूरहून नेपाळला कोणी गेले आहे का, याची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
नेपाळ येथे शक्तिशाली भूकंप होऊन पाचशेहून अधिक लोक मृत झाल्याचे वृत्त कोल्हापुरात पोहोचताच जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने या अनुषंगाने कोल्हापुरातून कोणी पर्यटक नेपाळला गेले आहे का, याची माहिती घेण्याचे काम सुरूकेले. तथापि, भूकंप झाला त्यावेळी कोल्हापूरचे कोणीही पर्यटक नेपाळमध्ये नव्हते; परंतु काही पर्यटक सिक्कीम, दार्जिलिंग येथे असल्याची माहिती मिळताच त्यांच्याशी संपर्क साधून ते सर्व सुखरूप असल्याची खात्री करून घेतली.
समर्थ हॉलिडेजतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा येथील सुमारे चाळीस जणांची एक सहल बुधवारी रात्री कोल्हापूरहून सिक्कीमला गेली आहे. हे सर्वजण एका खासगी कंपनीचे डिलर्स आहेत. या सहलीचे समन्वयक कृ ष्णात तोडकर यांनी आम्ही सर्वजण सुखरूप असल्याचे सांगितले. गंगटोक, कोलकाता करून ही सर्व मंडळी १ मे पर्यंत कोल्हापूरला पोहोचणार आहेत.
कोल्हापुरातील डॉ. नंदकुमार जोशी, त्यांच्या पत्नी मृणाली जोशी, डॉ. मिलिंद जोशी यांच्यासह आठजण नेपाळला जाणार होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांना नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची माहिती समजली. त्यामुळे त्यांनी आपली नियोजित सहल रद्द केली आहे. सध्या ही मंडळी सिक्कीममध्ये पोहोचली असून, सर्व सुखरूप आहेत, असे आपत्ती व्यवस्थापनकडून सांगण्यात आले.
जिल्हा प्रशासनाची तत्परता
नेपाळ येथील भूकंपाची माहिती वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध होऊ लागताच कोल्हापूरहून कोणी पर्यटनासाठी गेले आहे का, याची चौकशी करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शहरातील सर्व पर्यटन कंपन्यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई मंत्रालयाशी तसेच नेपाळ येथील हेल्पलाईनवरही संपर्क साधून कोल्हापूरचे कोणी पर्यटक आहेत का याची माहिती घेतली आहे. सायंकाळपर्यंत तरी कसलीच माहिती मिळाली नव्हती. जिल्ह्णातील सर्व प्रांत व तहसीलदारांना माहिती मिळवावी, अशा सूचना दिल्या आहेत.
पर्यटनासाठी गेलेल्या व्यक्तींची माहिती कळवा : जिल्हाधिकारी
कोल्हापूर : नेपाळ व उत्तर भारतात पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्णातील व्यक्तींची माहिती संबंधित तहसीलदार तसेच जिल्हा नियंत्रण कक्षात द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शनिवारी केले. जिल्ह्णातील पर्यटक व्यक्ती नेपाळ व उत्तर भारतात गेले असल्यास त्या व्यक्तीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्रमांक-०२३१-२६५९२३२) व ‘१०७७’ या टोल फ्री क्रमांकावर तसेच तहसील कार्यालय येथे द्यावी, असे आवाहन डॉ. सैनी यांनी पत्रकाद्वारे केले आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभाग येथील ‘०२२२-२२०२७९९०’ या क्रमांकावर पर्यटकांच्या नातेवाइकांनी संपर्क साधावा, असे आवाहन शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानेही केले आहे.