Kolhapur: ४९ ब्रास गौण खनिज, दहा टिपर ताब्यात; अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 12:22 PM2024-07-01T12:22:03+5:302024-07-01T12:23:04+5:30
चंदगड : अवैध गौण खनिज उत्खननावर जिल्हा खनिकर्म व चंदगड तहसील कार्यालयाच्या पथकाने रविवारी पहाटे राजगोळी बुद्रुक येथे छापा ...
चंदगड : अवैध गौण खनिज उत्खननावर जिल्हा खनिकर्म व चंदगड तहसील कार्यालयाच्या पथकाने रविवारी पहाटे राजगोळी बुद्रुक येथे छापा टाकून पोकलॅंड, १० टिपरसह ४९ ब्रास गौण खनिज जप्त केले. तालुक्यात प्रथमच मोठी कारवाई झाल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
रविवारी पहाटे जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकारी आनंद पाटील व तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने राजगोळी बुद्रुक येथे छापा टाकला. त्यामध्ये उत्खननासाठी वापरण्यात आलेले १ पोकलँड व १० टिपर व ४९ ब्रास गौण खनिज ताब्यात घेतले.
संयुक्त पथकात नायब तहसीलदार हेमंत कामत, अशोक पाटील, गावित, मंडल अधिकारी शरद मगदूम, तलाठी अक्षय कोळी, प्रशांत पाटील, गणेश रहाटे, शुभम मुंडे, सुनील सोमशेट्टी, अरुण शिंदे, महसूल सहाय्यक गौस मकानदार, दीपक अंबी व आप्पासाहेब नाईक सहभागी झाले होते.
‘उद्धवसेने’च्या आंदोलनास यश
गेल्याच आठवड्यात ‘उद्धवसेने’चे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, चंदगड विधानसभा संघटक राजू रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून चंदगड तालुक्यातील अवैध उत्खनन थांबावा, अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर ही कारवाई झाल्याने आंदोलनास यश आल्याने शिवसेनेकडून समाधान व्यक्त होत आहे.