kolhapur Crime: रोज एक टक्का परताव्याच्या आमिषाने ४९ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:29 PM2023-07-18T12:29:24+5:302023-07-18T12:30:40+5:30
सूत्रधार स्वत:हून पोलिसांसमोर हजर
कोल्हापूर : शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणुकीवर रोज एक टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी ४९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत स्वप्नजा पोवार (रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) आणि अमोल कुलकर्णी (रा. जळगाव) या दोघांवर गुन्हा दाखल झाला. या फसवणुकीला सर्वस्वी आपणच जबाबदार असून, स्वप्नजा पोवार हिचे नाव फिर्यादीतून कमी करावे, अशी मागणी कुलकर्णी याने सोमवारी (दि. १७) पत्रकार परिषदेत केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुंतवणुकीच्या ऑनलाइन चर्चासत्रातून कुलकर्णी आणि पोवार यांनी ओळख झाली होती. त्यातून या दोघांनी गुंतवणूकदारांना रोज एक टक्का परतावा देण्याचे आमिष दाखवून कोल्हापुरातील सुमारे १०० गुंतवणूकदारांची एक कोटी ४५ लाखांची गुंतवणूक करून घेतली. मे २०२२ ते सप्टेंबर २०२२ या काळात परतावा दिला. त्यानंतर परतावे रखडले.
याबाबत डॉ. अभिजित नारायण जाभळे (वय ४५, रा. मिठारी मळा, रंकाळा पश्चिम, कोल्हापूर) यांनी मार्च २०२३ मध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. एकूण १८ गुंतवणूकदारांची सुमारे ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा उल्लेख त्यांनी फिर्यादीत केला असून, गुंतवणूक घेणारी महिला स्वप्नजा पोवार हिला मुख्य संशयित आरोपी बनवले आहे. याबाबत कुलकर्णी याने पत्रकार परिषद घेऊन गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यातून पोवार या महिलेचे नाव कमी करण्याची विनंती पोलिसांना करणार असल्याचे सांगितले.
फसवणूक ४९ लाखांची की १८ लाखांची?
फिर्यादी डॉ. जांभळे यांनी ४९ लाखांची फसवणूक झाल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. मात्र, अमोल कुलकर्णी याने गुंतवणूकदारांचे केवळ १८ लाख देणे शिल्लक असल्याचे सांगितले. त्यामुळे फसवणूक ४९ लाखांची झाली, की १८ लाखांची झाली? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
सूत्रधारच हजर
पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांधील सूत्रधार पोलिस आणि गुंतवणूकदारांपासून पळ काढतात. मात्र, अमोल कुलकर्णी हा स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली. शिवाय पत्रकार परिषद घेऊन तो दुसऱ्या संशयिताचे नाव फिर्यादीतून काढण्याची विनंती करीत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.