‘गोकुळ’च्या प्रारूप यादीवरील ४९ हरकती फेटाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:27 AM2021-03-09T04:27:35+5:302021-03-09T04:27:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप यादीवर आलेल्या हरकतींपैकी तब्बल ४९ हरकती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप यादीवर आलेल्या हरकतींपैकी तब्बल ४९ हरकती फेटाळण्यात आल्या. भुदरगड तालुक्यातील आनफ येथील बिसमिल्ला दूध संस्थेचा ठरावच रद्द करण्यात आला. अवसायनातील तीन संस्थावगळून ३६५० संस्था प्रतिनिधींची अंतिम यादी शुक्रवारी (दि. १२) प्रसिद्ध होणार आहे.
‘गोकुळ’ची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकती मागवल्या होत्या. दुबार ठराव व इतर अशा ७६ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये ३५ दुबार ठराव तर ४१ इतर हरकती आल्या होत्या. यावर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर व सहायक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख यांच्यासमोर तीन दिवस सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली. दुबार ३५ पैकी नऊ जणांनी हरकतीवेळी तडजोड केली तर २५ जणांची हरकत फेटाळण्यात आली. आनफ येथील बिसमिल्ला दूध संस्थेचे उपाध्यक्ष रजाक महमद काझी व सभासद निसार अहमद खान यांनी दोन ठराव दाखल केले होते. सुनावणीदरम्यान, संचालक, अध्यक्ष व सचिव यांच्यात एकवाक्यता न झाल्याने ठराव रद्द केला. इतर ४१ हरकतींपैकी यादीत नाव समाविष्ट करावे म्हणून दाखल झालेल्या ११, ठराव बदलण्याबाबत १३ अशा २४ हरकती फेटाळण्यात आल्या.
‘गोकुळ’ने ३६५९ संस्थांची यादी दिली होती, त्यानुसार ठराव मागविले मात्र प्रत्यक्षात ३६५४ ठराव दाखल झाले. त्यापैकी १ बिसमिल्ला दूध संस्थेचा ठराव रद्द केल्याने ३६५३ ठराव राहिले. त्यापैकी तीन संस्था अवसायनात आहेत, त्यांचा यादीत समावेश होणार नसल्याने ३६५० ठरावधारकांची यादी शुक्रवारी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर प्रसिद्ध करणार आहेत.
आजच्या सुनावणीकडे लक्ष
निवडणुकीविरोधात ‘गोकुळ’ने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य शासनाच्या निवडणूक स्थगितीच्या आदेशालाच आव्हान दिले आहे. त्याची सुनावणी आज होत असून याकडे साऱ्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
‘पी. जी.’, ‘होडगे’, भरत मोरेंचे हरकती फेटाळल्या
जिल्हा बँकेचे संचालक पी. जी. शिंदे यांनी तुळजाभवानी दूध संस्था, वेतवडे व हनुमान संस्था, देवठाणेचे भरत मोरे यांनी यादीत समाविष्ठ करावे, अशी हरकत घेतली होती. शिवाजी होडगे यांनी बलभीम दूध संस्थेचा ठराव बदलण्याची मागणी केली होती, ती फेटाळण्यात आली.
यांचे दुबार ठराव फेटाळले -
दत्तात्रय हातकर (दत्त, महागोंडवाडी), सुमन पाटील (जयभवानी, किटवडे), दादासाहेब जाखले (क्रांती, उचगाव), आनंदा पाटील (गुंडू पाटील, परिते), तुकाराम सावंत (जयभवानी, बानगे), हिंदूराव शेंद्रे (शाहू, हणबरवाडी), छाया डावरे (जयभवानी, सोनगे), सुवर्णा सावंत (संत जनाबाई, सैतवडे), सुषभा शेटे (महालक्ष्मी महिला, निवडे), अंजना कांबळे (रमाबाई आंबेडकर, चौधरवाडी), रावसाहेब पाटील (महालक्ष्मी, येणेचवंडी), वनिता कुराडे (भवानी माता, येणेचवंडी), गोपाळ पाटील (गोकुळ, नांदवडे), अशोक पाटील (वाघजाई पणुत्रे), आनंदराव चौगले (भैरवनाथ, आळवे), अशोक सुतार (दत्त, वेतवडे), तुकाराम मगदूम (इंदिरा, माजगाव), सुमन विभूते (जयभवानी, वाघवे), शारदा जाधव (येसाबाई, दरेवाडी), रामचंद्र भारमल (रामलिंग, चिवाळे), कल्पना देसाई (जिजामाता सालपेवाडी), शिवाजी पाटील (त्रिमूर्ती, कासारपुतळे), आनंदराव पाटील व केरबा पाटील (हनुमान, माजगाव), शामराव जाधव (पावनाई, केर्ले), सदाशिव पाटील (गंगोबा, नांदगाव).
यांनी घेतली माघार-
सुरेखा वांजोळे (सावित्रीबाई, किणे), संगीता सांडुगडे (सुलोचना, एकोंडी), आप्पा घेवडे (हनुमान, चिंचेवाडी), निवास हातकर (मीनाताई ठाकरे, माजनाळ), निखील जाधव (हनुमान सावर्डे), मधुकर केंजळेकर (शिवशक्ती कोंडोशी), अमरसिंह पाटील (भैरवनाथ, गंगापूर), शुभम पाटील (पांडूरंग, करंजफेण), सागर पाटील (रामलिंग, चाफोडी).