विभागात ४९ हजार विद्यार्थ्यांना ‘प्रथम श्रेणी’
By Admin | Published: May 31, 2017 12:55 AM2017-05-31T00:55:09+5:302017-05-31T00:55:09+5:30
बहुतांश कॉलेजचा ९० टक्क्यांवर निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेत (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) कोल्हापूर विभागातून ८४४१ विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह, तर ४१२११ जण प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. शहरातील बहुतांश महाविद्यालयांनी निकालाच्या टक्केवारीची नव्वदी पार केली आहे.या परीक्षेत यंदा कोल्हापूर विभागातून १,२६,९७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १,२६,७६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १,१५,८६३ जण यशस्वी ठरले आहेत. त्यात ७५ टक्के आणि त्यापुढे गुण मिळवत प्रावीण्यासह प्रथम श्रेणीमध्ये ८४४१ विद्यार्थी, ६० टक्क्यांहून अधिक गुणांची कमाई करून प्रथम श्रेणी ४१२११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणीमध्ये ६०,८७१, तर उत्तीर्ण श्रेणीतील विद्यार्थी हे ५३४० इतके आहेत. विभागीय मंडळ शाखानिहाय निकालात कोल्हापूर विभाग हा राज्यात विज्ञानमध्ये ९७.७७ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे. वाणिज्य शाखेत ९५.२५ टक्क्यांसह द्वितीय, व्यवसाय अभ्यासक्रमात ९०.०८ टक्क्यांनी तृतीय आणि कला शाखेत ८१.३२ टक्क्यांसह सहाव्या क्रमांकावर आहे.
विभागात यावर्षी गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या २५ परीक्षार्थींवर कारवाई करण्यात आली. त्यात सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक १६ परीक्षार्थींचा समावेश आहे. कोल्हापुरातील ९ जणांवर कारवाई करण्यात आली. सांगलीमध्ये एकही गैरमार्गाचे प्रकरण घडले नाही. बारावीची पुरवणी परीक्षा ११ जुलैपासून घेण्यात येणार आहे. दरम्यान, दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आॅनलाईन निकाल जाहीर केला. निकाल पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने काही वेळ सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाल्याचे काही शिक्षक, विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
यशस्वितांचा आनंदोत्सव
या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत आनंदोत्सव साजरा केला. त्यात एकमेकांची गळाभेट घेऊन, काहींनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी केली. बहुतांश जणांनी मोबाईलद्वारे आपला निकाल जाणून घेतला. संकेतस्थळावरून निकाल डाऊनलोड करून अनेकांनी आपल्या नातेवाइकांना व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून पाठविला. यशस्वितांंना त्यांच्या काही मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांनी प्रत्यक्ष भेटून, तर काहींनी मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या.
शाखानिहाय निकाल
विज्ञान : ९७.७७ %
कला : ८१.३२ %
वाणिज्य : ९५.२५ %
व्यावसायिक विषय : ९०.०८ %