राज्यातील ५ सहकारी साखर कारखाने लिलावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 01:54 PM2021-03-03T13:54:39+5:302021-03-03T13:56:39+5:30
Sugar factory Kolhapur-
विश्वास पाटील
कोल्हापूर : हंगामभर पुरेल इतक्या उसाची शाश्वती नाही, उसाचे क्षेत्र वाढेल असे प्रयत्न नाहीत, गैरव्यवस्थापन अशा अनेक कारणांनी गेली कित्येक वर्षे तोट्यात असलेले राज्यातील पाच सहकारी साखर कारखाने आणि प्रत्येकी एक सूतगिरणी व दालमिल संस्था राज्य बँकेने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थांकडे राज्य बँकेचे तब्बल ७०४ कोटी ५९ लाख रुपये अडकले आहेत. त्यासाठी निविदा मागवल्या असून १६ मार्चला त्याचा निर्णय होणार आहे. पाच कारखान्यांवरील थकीत कर्ज ६३२ कोटी ७७ लाख रुपये आहे.
अन्य चार सहकारी साखर कारखाने व एक सूतगिरणी भाडे तत्त्वावर चालवायला देण्यासाठीही निविदा मागवल्या आहेत; परंतु विक्रीस काढलेले कारखाने व अन्य संस्थाही घेणार कोण हा कळीचा मुद्दा आहे. त्यातील बहुतांश कारखाने तरी भंगारात वजनावर विकावे लागतील, अशा स्थितीत असण्याची शक्यता आहे. मुळात विदर्भ व मराठवाड्यात प्रचंड उन्हाळा असतो. अजूनही सिंचनाच्या पुरेशा सुविधा नाहीत.
सरासरी अडीच हजार टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेला कारखाना हंगामात किमान चार लाख टनांचे गाळप झाले तरच तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो; परंतु पुरेसा ऊस नाही म्हणून गाळप नाही, गाळप नाही म्हणून तोटे वाढतात, तोटे वाढले म्हणून ऊसबिले थकीत आणि बिलेच मिळणार नसतील तर शेतकरी ऊस घालत नाहीत, अशा चक्रव्यूहात अडकलेले हे कारखाने आहेत. यातील साहेबराव डोणगावकर यांचा गंगापूरसारखा कारखाना तर १९७२ चा आहे.
साधारणता १९७२ ते १९९० च्या दरम्यानचे हे कारखाने आहेत. आता हे कारखाने विकत घेऊन तिथे नव्याने चालवण्याचे धाडस कोण करेल, अशी शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे ते भंगारात विकणे व मिळेल ते कर्ज खात्याला जमा करून घेणे एवढ्याचसाठी हा सगळा खटाटोप आहे.
थकीत कर्जाची रक्कम निविदा उघडण्यापूर्वी न भरल्यास जप्त मालमत्ता विक्री करून कर्ज वसुली केली जाईल. संपूर्ण कर्ज वसुली न झाल्यास कर्जदार व जामीनदार यांच्याकडून ही वसुली केली जाईल.
-डॉ. अजित देशमुख
व्यवस्थापकीय संचालक
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई.
विक्रीस काढलेले कारखाने व कर्जाचे ओझे
१.जय किसान बोदेगाव (जि.यवतमाळ)-२२२ कोटी
२.पांझराकान भाडणे (जि.धुळे) - ८१ कोटी ५५ लाख
३.बापूरावजी देशमुख वेळा (जि.वर्धा) - १२९ कोटी २२ लाख (इतर बँका ३३ कोटी)
४.जिजामाता दुसरबीड (जि.बुलडाणा)-७९ कोटी
५.गंगापूर रघुनाथनगर (जि. औरंगाबाद)-८८ कोटी
६.अकोट सूतगिरणी (जि.अकोला)-६७ कोटी २५ लाख
७.शेतकरी दालमिल मलकापूर (जि.लातूर)-४ कोटी ५७ लाख
भाडे तत्त्वावर देणाऱ्या संस्था
१.दत्ताजीराव कदम सूतगिरणी कौलगे (जि.कोल्हापूर)-१० कोटी
२.जय जवान साखर नळेगाव (जि.लातूर)-७८ कोटी
३.महेश साखर कडा (जि.बीड)-३२ कोटी ७८ लाख