वडगावच्या विकासासाठी पाच कोटी निधी देऊ : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:56+5:302021-07-04T04:16:56+5:30

कोरोनाच्या महामारीत निधीची मर्यादा असताना, येत्या चार महिन्यांत वडगावातील प्रलंबित विकासकामासाठी ५ कोटींचा निधी देऊ, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री ...

5 crore fund for development of Wadgaon: Rural Development Minister Hasan Mushrif | वडगावच्या विकासासाठी पाच कोटी निधी देऊ : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

वडगावच्या विकासासाठी पाच कोटी निधी देऊ : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Next

कोरोनाच्या महामारीत निधीची मर्यादा असताना, येत्या चार महिन्यांत वडगावातील प्रलंबित विकासकामासाठी ५ कोटींचा निधी देऊ, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

येथील वडगाव पालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी उद्यान व मराठा समाज अभ्यासिका हाॅलचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार राजू आवळे होते. यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, गटनेत्या प्रविता सालपे, अजय थोरात, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.

मुश्रीफ पुढे म्हणाले, शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत करूया. नगरविकास मंत्री व ग्रामविकास खात्यातील २५ ते ३० कोटींच्या निधीचे साटेलोटे करणार आहोत. याबाबत आमदार आवळे यांनी माझ्यासोबत पाठपुरावा केल्यास यातील पाच कोटी निधी निवडणूकपूर्वी देऊ. यासाठी आमदारांकडे पालिकेने पाठपुरावा करावा.

ते पुढे म्हणाले, कोरोनाचे ७० टक्के लसीकरण न झाल्यास पालिकेवर प्रशासक येणार आहे. तत्पूर्वी, पालिकेस निधी देऊ. आमदार राजू आवळे म्हणाले, वडगावकरांनी विधानसभा निवडणुकीत नेहमी आम्हास पाठबळ दिले आहे. त्यामुळे यातून उतराई होण्यासाठी जास्तीत जास्त निधी देऊ, तसेच मराठा समाजाच्या अभ्यासिका हाॅलवर बांधकामासाठी दहा लाखांचा निधी देऊ.

प्रास्ताविकात मोहनलाल माळी म्हणाले,

शहरात ३५ कोटींची विकासकामे केलेली आहेत. त्यामुळे शहराचा चेहरामोहराच बदलला आहे. कालिदास धनवडे यांनी आभार मानले. दरम्यान, कोरोना योद्धा संतोष सणगर, गणी हसन मुल्लाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुप्रसाद यादव, संदीप पाटील, शरद पाटील, सुनीता पोळ, नम्रता ताईगडे, शबनम मोमीन, मैमून कवठेकर, छाया गुरव आदी उपस्थित होते.

000

फोटो कॅप्शन पेठवडगाव : येथील वडगाव पालिकेच्या छत्रपती संभाजी उद्यानाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजू आवळे, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, प्रविता सालपे, सुनीता पोळ, अजय थोरात, गुरुप्रसाद यादव, संदीप पाटील, शरद पाटील, दशरथ पाटील आदी उपस्थित होते.

चौकट 1 : वडगावातील राजकारण दोन गटांमध्ये फिरते. भविष्यात काय होणार हे माहीत नाही, अशी गुगली मंत्री मुश्रीफ यांनी टाकली, तर कोरोनामुळे मंत्री आल्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालाय अशी हेडिंग येऊ नये याची दक्षता घ्या, असे म्हणताच हशा पिकला.

चौकट 2 : उपनगराध्यक्षांनी उद्घाटनाकडे फिरवली पाठ..!

मराठा समाज अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री मुश्रीफ यांनी उपनगराध्यक्षांच्या हस्ते नारळ वाढवा, असे आवाहन केले. यावेळी गटनेत्या प्रविता सालपे यांनी नारळ वाढविला. त्यानंतर उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण यांनी या उद्घाटनाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: 5 crore fund for development of Wadgaon: Rural Development Minister Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.