सायबर इन्स्टिट्यूटला ‘रूसा’कडून पाच कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 02:07 PM2019-01-30T14:07:26+5:302019-01-30T14:08:26+5:30
राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाकडून (रूसा) छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अॅन्ड रिसर्चला (सायबर) विविध उपक्रमाअंतर्गत पाच कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. देशातील १५ स्वायत्त शिक्षण संस्थांमध्ये उद्योजकता, रोजगारभिमुखता व करिअर केंद्र सुरू केले जाणार आहे. त्यामध्ये सायबरचा समावेश आहे. या केंद्राचे उदघाटन रविवारी (दि. ३) दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने उदघाटन होणार आहे, अशी माहिती सायबरचे ‘रूसा’ समन्वयक डॉ. सी. एस. दळवी आणि संचालक डॉ. एम. एम. अली यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाकडून (रूसा) छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अॅन्ड रिसर्चला (सायबर) विविध उपक्रमाअंतर्गत पाच कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. देशातील १५ स्वायत्त शिक्षण संस्थांमध्ये उद्योजकता, रोजगारभिमुखता व करिअर केंद्र सुरू केले जाणार आहे. त्यामध्ये सायबरचा समावेश आहे. या केंद्राचे उदघाटन रविवारी (दि. ३) दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने उदघाटन होणार आहे, अशी माहिती सायबरचे ‘रूसा’ समन्वयक डॉ. सी. एस. दळवी आणि संचालक डॉ. एम. एम. अली यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. दळवी म्हणाले, रूसाने देशातील ४८०० संस्थांपैकी पात्र असणाऱ्या ५५० शिक्षण संकुलांची विविध निकषांवर चाचणी घेतली. त्यातून नऊ स्वायत्त संस्था निवडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सायबरचा समावेश आहे. रूसाकडून मिळालेला निधी हा शिक्षक प्रशिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटायझेशन, उद्योजकता केंद्र आदींसाठी खर्च केला जाणार आहे.
उद्योजकता केंद्राच्या माध्यमातून नवउद्योजकांना उद्योगाची सुरूवात, व्यवस्थापन आदींबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. उद्योजकांना कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. या पत्रकार परिषदेस सायबरचे विश्र्वस्त डॉ. व्ही. एम. हिलगे, डॉ. दिपक भोसले, प्रा. सचिन जगताप, आदी उपस्थित होते.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
‘सायबर’चे संस्थापक प्रा. डॉ. ए. डी. शिंदे यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवार (दि. ३) ते मंगळवार (दि.५) दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये रविवारी सकाळी पावणेदहा वाजता रक्तदान शिबीर, दहा वाजता आनंद ग्रंथोत्सवाचे उदघाटन आणि सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांचे व्याख्यान होणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी दिवसभर आंतरमहाविद्यालयीन महोत्सव आणि सीएनसीव्हीसी डब्ल्यू वार्षिक प्रदर्शन होणार असल्याची माहिती डॉ. हिलगे यांनी दिली.