Kolhapur: करवीर पंचायत समिती पतसंस्थेत ५ कोटींचा ढपला; जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:38 PM2024-09-04T17:38:31+5:302024-09-04T17:38:54+5:30

मृत सचिवाकडून वसुलीसाठी संस्थेकडून प्रयत्न

5 crore scam in Karveer Panchayat Samiti Employees Cooperative Credit Institution | Kolhapur: करवीर पंचायत समिती पतसंस्थेत ५ कोटींचा ढपला; जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार  

Kolhapur: करवीर पंचायत समिती पतसंस्थेत ५ कोटींचा ढपला; जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार  

कोल्हापूर : करवीर पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत ५ कोटी ३१ लाख २४ हजार रुपयांचा ढपला पाडल्याची तक्रार पतसंस्थेच्या ४८ ठेवीदारांनी मंगळवारी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. संस्थेचे मृत सचिव पी. ए. परिट यांनी हा ढपला पाडल्याचे संस्थेच्या अध्यक्षासह संचालकांचे म्हणणे आहे, परंतु परिट गैरव्यवहार करत असताना, अध्यक्षासह संचालकांना काहीच कसे लक्षात आले नाही, अशी विचारणा ठेवीदारांनी केली आहे. संस्थेचे अंतर्गत लेखापरीक्षक बी. एस. पाटील यांनी २०२३-२४ सालचे लेखापरीक्षण केले आहे. त्यांनीही अपहार झाल्याचे मान्य केले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

ठेवीदार सुबराव पवार, आप्पासाहेब नुल्ले, गणेश शेलार, सुरेखा पवार, शहिदा हेरवाडे, प्रकाश घबाडे आदींनी त्यांची किती रकमेची फसवणूक झाली, त्या रकमेसह ही तक्रार केल्याने ही बाब गंभीर आहे. निवृत्त मुख्याध्यापक कृष्णा बाबाजी वरेकर यांनी निवृत्तीनंतर मिळालेले पैसे, तसेच गावाकडील जमीन विकून मिळालेले पैसे सुमारे ६० लाख रुपये या संस्थेत ठेवले होते. ही रक्कम परत मिळेना या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे.

ठेवीदार जानेवारी २०२४ पासून ठेवीची मागणी करत आहेत, परंतु एकाही ठेवीदारास ते पैसे देऊ शकलेले नाहीत. त्यावरून संभ्रमाचे वातावरण तयार झाल्यावर संस्थेच्या अध्यक्षांनी, संचालक व मानद सचिव यांची एकत्रित बैठक घेतली. त्यामध्ये ठेवीदारांनी एकूण १३ कोटी ठेवींपैकी अडीच कोटी कर्ज वजा जाता उर्वरित १० कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी कुठे आहेत, अशी विचारणा केल्यावर त्यांना काहीच सांगता आले नाही. संस्थेच्या चालू खात्यावर सध्या फक्त पाच-सहा लाख रुपयेच असल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे.

स्थावर मालमत्ताच नाही..

या पतसंस्थेने १५० ठेवीदारांच्या सुमारे १३ कोटींच्या ठेवी स्वीकारल्या आहेत. या संस्थेची स्थावर मालमत्ता काहीही नाही. संस्थेचा आर्थिक व्यवहार फक्त ठेवींवरच सुरू होता. कॅश क्रेडिट नाही. संस्थेची आर्थिक उलाढाल करण्याची क्षमता अडीच ते तीन कोटी रुपयांचीच आहे. असे असतानाही संस्थेने गरजेपेक्षा जास्त ठेवी स्वीकारून संगनमताने खोटे वार्षिक अहवाल तयार करून गैरव्यवहार केल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे.

एकाही ठेवीदारास ठेव मिळेना..

संस्थेचे सचिव एम. ए. देसाई यांनी आमची चूक झाली, जी काय शिक्षा होईल, ती आम्ही भोगावयास तयार आहे, अशी कबुली ठेवीदारांसमक्ष दिली होती. सर्व ठेवीदारांची रकम संस्थेचे मयत सचिव पी. ए. परिट यांच्या मालमत्तेतून तत्काळ वसूल करून आणि सर्व संचालक मंडळ मिळून रक्कम भरून ठेवी परत करण्याची व्यवस्था करत आहे, असे आश्वासन दिल्यामुळे आजपर्यंत आम्ही ठेवीदार संयमाने राहिलो, परंतु आजअखेर एकाही ठेवीदाराला रक्कम परत मिळाली नसल्याने आम्ही तक्रार केल्याचे ठेवीदारांनी सांगितले. संस्थेने मयत सचिव परिट यांच्या व त्यांच्या वारसांविरुद्ध सहकार न्यायालय क्रमांक १ मध्ये मनाई दावा दाखल केला आहे.

Web Title: 5 crore scam in Karveer Panchayat Samiti Employees Cooperative Credit Institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.