Kolhapur: परजिल्ह्यातील शिक्षकांकडे ५ कोटी अडकले, जामीनदारांचे धाबे दणाणले

By राजाराम लोंढे | Updated: March 3, 2025 15:21 IST2025-03-03T15:20:14+5:302025-03-03T15:21:48+5:30

जिल्हा बदली करून ते गेले; पण शिक्षक बँकेच्या कर्जाकडे पाठच फिरवली

5 crore stuck in Kolhapur primary teachers' bank with the teachers of the district | Kolhapur: परजिल्ह्यातील शिक्षकांकडे ५ कोटी अडकले, जामीनदारांचे धाबे दणाणले

Kolhapur: परजिल्ह्यातील शिक्षकांकडे ५ कोटी अडकले, जामीनदारांचे धाबे दणाणले

राजाराम लोंढे

कोल्हापूर : बदली झाल्याने आपल्या स्वत:च्या जिल्ह्यात गेल्याने अनेक शिक्षकांची सोय होते; पण हीच बदली आता कोल्हापूरच्या प्राथमिक शिक्षकबँकेच्या मुळावर येत आहे. जिल्हा बदली करून ते गेले; पण शिक्षक बँकेच्या कर्जाकडे पाठच फिरवली. तब्बल ८५ शिक्षकांकडे ४ कोटी ८५ लाख रुपये अडकले असून त्यातील १३ शिक्षक थेट थकबाकीतच गेले आहेत. त्यांच्यावर बँकेने आता कायदेशीर कारवाई सुरू केल्याने जामीनदारांचे धाबे दणाणले आहेत.

सगळ्या प्रकारच्या वित्तीय संस्थेत शंभर टक्के वसुली पगारदार कर्मचाऱ्यांच्या संस्थेमध्ये होते. कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच मासिक हप्ता जमा होत असल्याने वसुलीसाठी फारशी ताकद लावावी लागत नाही. प्राथमिक शिक्षक बँकेची थकबाकी राहण्याचा प्रश्नच येत नाही; पण जिल्हा बदली करून शिक्षक गेल्यानंतर त्याच्याशी संबंधित वित्तीय संस्थांची ना-हरकत घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेने त्यांना सोडायचे नसते; मात्र २०१८-१९ मध्ये जिल्हा बदली करून निघालेल्या शिक्षकांना अडवू नका, असे फर्मान तत्कालीन मंत्र्यांनी काढले होते. त्यानंतर, काही कर्जदार शिक्षक गेले, त्यांच्याकडून वसुलीचे प्रयत्न झाले; पण ते दाद देत नाहीत.

तीन कर्जदारांकडे ५१.२६ लाख थकबाकी

शिक्षक बँकेच्या थकबाकीपैकी तीन जणांकडेच ५१ लाख २६ हजारांची रक्कम आहे. यामध्ये, यशवंत चौधरी (बाफळन, नाशिक), महावीर कांबळे (लोट्यावाडी, सांगोला), प्रकाश टाेपे (होनाळा, तुळजापूर) यांचा समावेश आहे.

एका अर्जावर ४० लाखांचे कर्ज

शिक्षक बँकेत कर्जाची प्रक्रिया खूपच सोपी आहे. पगाराची हमी असल्याने दोन जामीनदार घेतले की एका अर्जावर ४० लाख रुपये कर्ज मिळते; मात्र राज्यातील शिक्षक बँक, पतसंस्था एवढे कर्ज देत नसल्याने वसुलीला तोही अडसर आहे.

आता जामीनदार रडारवर

बँकेने यापूर्वी कलम १३८ नुसार कारवाई केली; पण थकबाकीदार त्याला जुमानत नाहीत. जामीनदार कोल्हापूरचे; पण कर्जदार असताना आमच्यावर कारवाई का? असे म्हणत अंग झटकत आहेत; मात्र आता सहकार विभागाने १०१ च्या नोटिसा काढल्याने जामीनदार अडचणीत येणार आहेत.

कायदेशीर मार्गाने वसुलीचे काम सुरू असून मार्चपूर्वी यातील जास्तीत जास्त रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न आहे. - संजयकुमार मगदूम (मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षक बँक)

Web Title: 5 crore stuck in Kolhapur primary teachers' bank with the teachers of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.