सीपीआरला औषधांसाठी पाच कोटी
By admin | Published: December 25, 2014 12:45 AM2014-12-25T00:45:11+5:302014-12-25T00:48:23+5:30
विनोद तावडे : आवश्यक यंत्रसामग्रीही देणार; रिक्त पदे एप्रिलपर्यंत भरण्याचे आदेश
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाला (सीपीआर) औषध खरेदीकरिता पाच कोटींचा निधी देण्याची तसेच आवश्यक ती यंत्रसामग्री पुरविण्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज, बुधवारी नागपूर येथे कोल्हापूरच्या शिष्टमंडळाला दिली. रुग्णालयातील रिक्त असणारी शिपाई ते वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंतची पदे येत्या एप्रिलपर्यंत भरावीत, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन नुकतेच मंत्री तावडे यांना ‘सीपीआर’बाबत निवेदन दिले होते; तसेच या विषयावर एक बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही बैठक झाली. बैठकीत आमदार क्षीरसागर तसेच ‘सीपीआर बचाव समिती’चे निमंत्रक वसंतराव मुळीक, बबन रानगे, भगवान काटे यांनी ‘सीपीआर’ संदर्भातील अडचणी सांगितल्या. शेंडा पार्क येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र रुग्णालय उभे करून सीपीआरला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, औषध खरेदीकरिता सात कोटींचा निधी द्यावा, सीटी स्कॅन, व्हेंटिलेटर, वैद्यकीय उपकरणे, वातानुकूलित यंत्रे उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्या आमदार क्षीरसागर यांनी केल्या.
मंत्री तावडे यांनी वरील निधीबरोबरच शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामास दीड कोटींचा निधी तातडीने मंजूर करावा, असे आदेश दिले. यावेळी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, आरोग्य संचालक शिंगाटे, डीन डॉ. दशरथ कोठुळे, किशोर घाटगे, सुनील जाधव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)