क्रीडा संकुलासाठी ५ मार्चची ‘डेडलाईन’
By Admin | Published: February 1, 2015 01:09 AM2015-02-01T01:09:01+5:302015-02-01T01:32:21+5:30
पालकमंत्र्यांकडून संकुलाची पाहणी : ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा ठेकेदाराला दम; पाच मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर : पाच मार्चपूर्वी विभागीय क्रीडा संकुलातील पहिल्या टप्प्यातील फुटबॉल मैदान, अॅथलेटिक्स ट्रॅक, बास्केटबॉल मैदान, खो-खो मैदान आणि शूटिंग रेंज हे पूर्ण करून द्यावे. पाच मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते संकुलाचे उद्घाटन करणार आहे. काम पूर्ण न केल्यास ब्लॅकलिस्टमध्ये टाकू, असा सज्जड दम बांधकाम ठेकेदार सचिन मुळे यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, शनिवारी विभागीय क्रीडा संकुल येथे आढावा बैठकीत दिला.
विभागीय क्रीडा संकुलाचे बांधकाम ठेकेदारास जुने दर मंजूर नसल्याने व थकीत बिलापोटी बंद पडले होते. बंद पडलेले संकुलाचे काम मार्गी लागावे, याकरिता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पद्माळा येथील संकुलात आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ठेकेदार सचिन मुळे, जिल्हाधिकारी राजाराम माने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व क्रीडा उपसंचालक यांच्या उपस्थितीत काम सुरू होण्याच्या दृष्टीने तोडगा काढण्यासाठी बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ठेकेदाराचे थकीत १ कोटी ३० लाख रुपये देण्याचे मान्य केले. मात्र, पेमेंट देण्यापूर्वी ठेकेदाराने ८० लाखांची बँक गॅरंटी देणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यानुसार ठेकेदार मुळे यांनी मंगळवारी बँक गॅरंटी देण्याचे मान्य केले आहे. यावर जिल्हाधिकारी माने यांनी थकीत रकमेचा धनादेश गुरुवारी देण्याचे मान्य केले आहे. याचबरोबर चुकीच्या ठिकाणी बांधलेला जलतरण तलावाच्या नव्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिझाईननुसार तलावाची दुरुस्ती याचदरम्यान ठेकेदाराने करून देण्याचेही मान्य केले आहे. सोमवार (दि. २)पासून काम सुरू करण्याचे आदेशही पालकमंत्री पाटील यांनी ठेकेदारास दिले आहेत.
येत्या पाच मार्चपूर्वी फुटबॉल मैदान, अॅथलेटिक्स ट्रॅक, बास्केटबॉल मैदान, खो-खो मैदान आणि शूटिंग रेंज या पाच क्रीडा प्रकाराची मैदाने खेळण्यास सज्ज करावीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते संकुल उद्घाटन करण्यास तयार ठेवावीत. दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास ठेकेदारास ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा दम पालकमंत्री पाटील यांनी दिला.
यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने, क्रीडा उपसंचालक बी. एन. मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे, अधीक्षक अभियंता ए. एस. उपळे, अभियंता सी. एस. आयरेकर, एन. एम. वेदपाठक, क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सुभाष पवार, आदी उपस्थित होते.
१४ कोटींचे संकुल पोहोचले ३६ कोटींवर
विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी तत्कालीन सरकारने १४ कोटी रुपयांची निविदा काढली. पुढे १४ कोटी रुपयांत हे संकुल उभारणे शक्य नाही म्हणून शासकीय पातळीवर पुन्हा १६ कोटींची निविदा मंजूर करण्यात आली. पुढे बांधकामासाठी कच्च्या मालाचे दरही भडकले. प्रथम थकीत बिल न मिळाल्याने ठेकेदाराने काम बंद ठेवले. पुढे मार्च २०१४ मध्ये ३७ कोटी ३३ लाखांचे सुधारित अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवले. ३६ कोटी ८२ लाख रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक मार्च महिन्यात मंजूर केले. जुलैपर्यंत तीनवेळा ब्रेक घेत कसेबसे ७० टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर थकीत
बिल, सुधारित दर यावर संकुलाचा गाडा पुढे जाईना. अखेर राज्यातील सरकारही बदलले. २९ नोव्हेंबरच्या जिल्हा नियोजन आढावा बैठकीत विभागीय संकुल बांधकामाबद्दल ठेकेदाराकडून काम काढून घेण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. आज, शुक्रवारी दुसऱ्या आढावा बैठकीत थेट पालकमंत्री यांनी संकुलातच बैठकीचे आयोजन करीत विषय निकाली काढला.
कोल्हापुरात फुटबॉलशिवाय काय चालत नाही
कोल्हापूरकरांच्या नसानसांत फुटबॉल इतका भिनला आहे, की कोल्हापूरकर फुटबॉलशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे विभागीय क्रीडा संकुलातील फुटबॉलचे मैदान प्रथम पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व क्रीडा उपसंचालक आणि ठेकेदारास दोनवेळा आवर्जून सांगितली.
कामाच्या दर्जाची तपासणी होणार
ठेकेदाराने केलेल्या कामाची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व तज्ज्ञ यांच्या समितीद्वारे केली जाणार आहे. समितीच्या अहवालानंतर ठेकेदाराचे पुढील बिल अदा करण्याचे या बैठकीत ठरले आहे. तसेच सहा महिन्यांत संपूर्ण संकुलाचे बांधकामही पूर्ण करण्याची अट या बैठकीत घालण्यात आली आहे.
दुधाळीत १० मीटरच्या नवीन रेंजचा प्रस्ताव
दुधाळी येथे यापूर्वीच्या शूटिंग रेंजच्या शेजारी दहा मीटरची नवीन शूटिंग रेंज उभारण्याचा एक कोटी चार लाख रुपयांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने पालकमंत्री पाटील यांच्याकडे दिला आहे. या रेंजलाही मंजुरी मिळाल्यास आणखी एक अद्ययावत रेंज कोल्हापूरच्या नेमबाजांना सरावासाठी उपलब्ध होणार आहे.